Sun, Jul 05, 2020 12:49होमपेज › Vidarbha › वर्ध्यात कोरोना बाधित परिचारिका व पतीवर गुन्हा

वर्ध्यात कोरोना बाधित परिचारिका व पतीवर गुन्हा

Last Updated: May 27 2020 10:41AM

संग्रहित छायाचित्रनागपुर : पुढारी वृत्तसेवा

मुंबईहून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यात आलेली सायन येथील परिचारिका आणि तिच्या पतीवर गृह विलगिकरणाचे नियम मोडून कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावंगी मेघे येथील परिचारिका मुंबई येथून १६ मे रोजी वर्धा जिल्ह्यात आली. तिने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही. जिल्हा बंदी असताना ही महिला वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. मुंबईहून आल्यावर वर्धेत आल्याची कुणालाही माहिती दिली नाही. तर आरोग्य तपासणी सुद्धा करुन घेतली नाही.

आरोग्य विभागाने २१ मे रोजी संपूर्ण कुटुंबाला गृह विलागीकरण केल्यावर सुद्धा तिचे पती गावात इतरत्र फिरत होते. सदर महिला आज कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून महिलेच्या पतीने कुणाच्याही संपर्कात न आल्याची खोटी माहिती दिली. मात्र प्राप्त माहितीनुसार महिलेचा पती गावभर फिरत असल्याचे उघड झाले असून त्यांनी कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत नोडल अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परिचारिका आणि पती विरुद्ध सावंगी मेघे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.