Sat, Aug 24, 2019 09:54होमपेज › Vidarbha › भाजपने केली रिपाइंशी बेईमानी? रिपाइंचे नेते नाराज

भाजपने केली रिपाइंशी बेईमानी? रिपाइंचे नेते नाराज

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 12:17AMनागपूर : प्रतिनिधी

राज्यात भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला केंद्रीय मंत्रीपदासोबत राज्यात विधानपरिषदेच्या दोन जागा आणि सुमारे 10 टक्के मंत्रीपद देण्याचे कबूल केले होते. मात्र भाजपकडून रिपाइंला ठेंगा दाखविण्यात आला आहे, असा दावा रिपाइंकडून केला जात आहे. रिपाइंच्या नेत्यांमध्ये भाजपच्या विरोधात संतप्त भावना व्यक्‍त केल्या जात आहेत. भाजपने रिपाइंसोबत बेईमानी केली असल्याने रिपाइं नेते दयाल बहादुरे यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्येक्‍त केला आहे.

विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी भाजपाने राष्ट्रीय समाज पक्षाचे मंत्री महादेव जानकर, विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि बंजारा समाजाचे निलय नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात रिपाइंचा एकाही उमेदवाराचा विचार केला नसून त्यासाठी भाजपने साधी चर्चाही केली नसल्याने रिपाइं नेते संतापले असल्याचे दयाल बहादुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सत्तेवर येण्यापूर्वी रिपाइं आणि भाजपात झालेल्या संयुत्‍क कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काही बाबी मान्य केल्या होत्या. त्यात 27 सटेंबर 2014 रोजीची फडणवीस आणि रिपाइंचे अध्यक्ष भूपेश थुलकर यांची सही आहे. यात स्पष्टपणे रिपाइंला केंद्रीय मंत्रीपदासोबतच राज्य विधानपरिषदेत दोन जागा, सुमारे 10 टक्के मंत्रीपद, केंद्रातील विविध समित्या आणि महामंडळावर 7 सदस्य पदे देण्याचे कबूल केले होते. मात्र त्याचा विसर आता फडणवीस यांना पडला असल्याने रिपाइंमध्ये नाराजी व्यक्‍त केली जात असल्याचेही बहादुरे यांनी सांगितले.