Fri, Jan 24, 2020 16:59होमपेज › Vidarbha › आमची युती हिंदुत्वासाठी : आदित्य ठाकरे

आमची युती हिंदुत्वासाठी : आदित्य ठाकरे

Published On: Aug 28 2019 1:51AM | Last Updated: Aug 28 2019 1:51AM
नागपूर : प्रतिनिधी

शिवसेना कदापिही विश्वास तोडणार नाही. आमची युती सत्तेसाठी नाही, कोणाच्या किती जागा यासाठीही नाही; तर आमची युती हिंदुत्वासाठी आहे, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. उपमुख्यमंत्रिपदाचा पेपर मी आता फोडणार नाही, असे स्पष्ट करून आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांची गुगली घेतली.

जनआशीर्वाद यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात आज राज्याच्या उपराजधानीतून झाली. नागपूर विमानतळावर जनआशीर्वाद यात्रेचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार गजानन कीर्तिकर, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, महसूलमंत्री संजय राठोड, सचिन अहिर, खा. कृपाल तुमाने, माजी खासदार प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. जनआशीर्वाद यात्रेचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

शिवसेना-भाजप युती राममंदिर, आणि विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे. त्यामुळे सत्तेपेक्षा हे मुद्दे आम्हाला महत्त्वाचे आहेत. युतीबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोडवतील. युतीबाबतचा निर्णय हे दोन नेते घेतील. सत्तेत असू किंवा नसू, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करत राहू. सरकारमध्ये असलो तरी शेतकर्‍यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलन करावेच लागेल, असे ते म्हणाले.

विरोधी पक्ष शिल्लकच कुठे?

सत्तेत असूनही तुम्ही जनसमस्यांवर आंदोलन कसे करता, असे विचारले असता राज्यात विरोधी पक्ष शिल्लक आहे कुठे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. जनसमस्यांची सोडवणूक करण्यासाठी आवाज उठवणे हे काम विरोधकांचे आहे. मात्र विरोधक केवळ गोंधळे आहेत, अशी टीका त्यांनी केली.