होमपेज › Vidarbha › आता होणार गाढवांची गणना

आता होणार गाढवांची गणना

Published On: May 21 2019 1:50AM | Last Updated: May 21 2019 1:50AM
नागपूर : प्रतिनिधी  

राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. 

गाढव हा प्राणी कष्टाळू म्हणून जगभरात ओळखला जातो. मात्र, या प्राण्याला सन्मान दिला जात नाही. प्राणी जगतात याच प्राण्याच्या वाट्याला सर्वात मोठी उपेक्षा आली. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 29 हजार 132 गाढव आहेत. हा प्राणी पाळीव असला, तरी त्याच्याकडून कामे करून मोकाट सोडले जाते. प्रामुख्याने भटक्या जमातींमध्ये हा प्राणी पाळला जातो. कष्टाची कामे करण्यास हा प्राणी थकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या प्राण्यांच्या संवर्धनासाठी कागदोपत्री योजना आहेत. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नाही, असा भटक्या जमाती संघटनांचा आरोप आहे. 

गाढव या प्राण्याबाबत देशभरातील स्थिती जाणून घेण्यासाठी 10 सप्टेंबर 2017 ला दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाढवांची संख्या कमी होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारला यासंदर्भात पत्र दिले.