Wed, Feb 26, 2020 19:56होमपेज › Vidarbha › तुकाराम मुंढे रूजू  होण्यापूर्वीच नागपूर मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शिस्‍तीची रंगीत तालीम

तुकाराम मुंढे रूजू  होण्यापूर्वीच नागपूर मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शिस्‍तीची रंगीत तालीम

Last Updated: Jan 24 2020 3:28PM
नागपूर : प्रतिनिधी  

राज्यातील विविध महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य प्रशासकीय यंत्रणा येथील तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीतील किस्से ऐकून नागपूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी स्वतःला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अतिशय शिस्तप्रिय असलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपुर महापालिका आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यायला सुरुवात केली आहे. यामुळे मुंढे रूजू होण्यापूर्वीच नागपुर महापालिकेत कर्मचार्‍यांनी शिस्तीची रिहर्सल सुरू केली आहे. मुंढे यांची प्रशासकीय धास्ती कर्मचार्‍यांनी घेतली असल्याचे चित्र महापालिकेत बघायला मिळत आहे.

अधिक वाचा : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्‍यांना तिकीट देऊ नका, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका

सातच्या आत घरात.. या म्हणीप्रमाणे कर्मचारी आणि अधिकारी दहाच्या आत महापालिकेत हजेरी लावत आहेत. मागील तीन दिवस दररोज नित्यनियमाने नागपूर महापालिकेतील कर्मचारी दहा वाजण्याच्या ठोक्याला पालिकेत हजर असतात. मुंढे कोणत्याही क्षणी येतील याची धास्ती घेऊन महापालिका इमारतीत साफसफाई नित्यनियमाने होत आहे. तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. नागपूर मनपातील बरेचसे कर्मचारी बुधवार, गुरूवार आणि शुक्रवारी चक्क वेळेवर मनपा कार्यालयात दाखल झाले. बऱ्याचदा वेळेवर न येणारे अधिकारीही दहाच्या ठोक्याला मनपाच्या कार्यालयात दाखल होत आहेत. 

अधिक वाचा : निर्भया प्रकरण : दोषींच्या वकिलाची पुन्हा कोर्टात धाव

नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनीही नागपुरातील अतिक्रमणे ताबडतोब हटवा असे आदेश दिले आहेत. नागपुरातील विकास कामे करण्यासाठी नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सोबत एकत्रितपणे सामंज्यस्याने काम करण्याची तयारीही नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दाखविली आहे. या संदर्भात बोलताना जोशी म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली. शासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्राशसकीय शिस्त लावून प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रशासकीय नेतृत्वाचा ठसा उमटविला. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम कामगिरी केली. यापुढे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन अधिक जोमाने काम करेल आणि नागपूर शहराचा विकास जोमाने होण्यास मदत होईल, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा : शरद पवारांच्या दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेत कपात

तुकाराम मुंढे हे एक वरिष्ठ अनुभवी सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या अनुभवाचा नागपूर महापालिकेला फायदाच होईल, असा विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने मंगळवारी २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश आहे. राज्य सरकारने त्यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन भाजप सरकारमध्ये त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असून त्यांना अडचणीत आणण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलले जाते. तुकाराम मुंढे हे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ओळखले जातात.

मुंढे जिथे जातील तिथे महापालिकेतील सत्ताधारी आणि मुंढे यांचा संघर्ष होतो. त्यामुळे भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात मुंढे यांची बदली करून भाजपवर कुरघोडी करण्याचा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. सध्या नागपूरच्या महापौरपदी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी आहेत. त्यामुळे हा देवेंद्र फडणवीस यांनाच शह देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.