होमपेज › Vidarbha › पूरक उद्योगांना चालना देणार : नितीन गडकरी

पूरक उद्योगांना चालना देणार : नितीन गडकरी

Published On: Nov 15 2017 1:58AM | Last Updated: Nov 15 2017 12:42AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

बांबू, मत्स्योत्पादन, मधनिर्मिती, दुग्धोत्पादन आणि इथेनॉल निर्मितीसारख्या पूरक उद्योगातून शेतकर्‍यांनी आपल्या उत्पन्नात सातत्यपूर्ण वाढ करावी. समृद्धीचा मार्ग खुला होण्यासाठी वैज्ञानिक बदलांची कास धरून शेती तंत्रज्ञानात बदल करावे, असे प्रतिपादन केंद्रीय सिंचन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रेशिमबाग मैदानावर तीन दिवस चाललेल्या ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

सोमवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, हरियाणाचे कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड, मध्य प्रदेशचे कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन, खासदार अजय संचेती, रामदास तडस यांच्यासह आशिष देशमुख, नाना शामकुळे, रामदास आंबटकर, पाशा पटेल आणि डॉ.परिणय फुके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

ना. गडकरी यांनी कृषीक्षेत्रातील विविध विषयांना स्पर्श करीत, अ‍ॅग्रो व्हिजनमुळे शेतकर्‍यांचा आत्मविश्‍वास वाढला असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, रवी बोरटकर यांनी प्रास्ताविकातून, अ‍ॅग्रो व्हिजन हे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ठरले असून त्यात 5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा सहकार महर्षी हा पुरस्कार विदर्भातून प्रथमच मिळविणारे महाऑरेंजचे संस्थापक श्रीधर ठाकरे यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यासोबतच, अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रमुख मार्गदर्शक नितीन गडकरी यांनाही नांगर देऊन सन्मानित करण्यात आले. 

विदर्भातील शेतकर्‍यांनी बांबूची लागवड करावी आणि हे पीक आपण उसाच्या भावाने विकत घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. मत्स्योत्पादनात विदर्भ मागे असून, पुढच्या वर्षी अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये या विषयावर कार्यशाळा घ्यावी, असे निर्देश त्यांनी आयोजकांना दिले.  

सरकारच्या अधिकारात येणारी झुडपी जमीन वापरात येत नव्हती. या हजारो हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करून झुडपी जमिनीचा विषय संपवत ती महसूली जमीन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यासोबतच, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात गंगा नदीच्या दोन्ही काठांवर 10 लाख बांबूचे रोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चंद्रपुरात लवकरच युरिया प्लॅण्ट सुरू करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले.