Sat, Aug 17, 2019 22:22होमपेज › Vidarbha › पाच वर्षांत सर्वाधिक रोजगारनिर्मिती महाराष्ट्रातच : मुख्यमंत्री

पाच वर्षांत सर्वाधिक रोजगारनिर्मिती महाराष्ट्रातच : मुख्यमंत्री

Published On: Aug 05 2019 1:26AM | Last Updated: Aug 05 2019 1:46AM
नागपूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील युती सरकारने मागील पाच वर्षांत रेकार्ड ब्रेक कामे केली आहेत. राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 30 हजार कि.मी.चे रस्ते तयार केले. दीड लाख शेतकर्‍यांना वीज जोडण्या दिल्या. पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासातही महाराष्ट्र सर्वात पुढे असून, देशात सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे. नीती आयोगानेही मागील पाच वर्षांत देशात सर्वाधिक रोजगारनिर्मिती ही महाराष्ट्रात झाल्याचा अहवाल दिला आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया येथे जाहीर सभेत केला. 

भाजप सरकारने मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशेब जनतेला देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढण्यात आली. ही यात्रा सायंकाळी गोंदिया येथे दाखल झाली. यावेळी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खा. सुनील मेंढे, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ. राजकुमार बडोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली नाहीत त्यापेक्षा तिप्पट कामे ही मागील पाच वर्षांत युती सरकारच्या कार्यकाळात झाली आहे. आघाडी सरकारने 15 वर्षांत शेतकर्‍यांसाठी केवळ 15 हजार कोटी रुपये दिले, तर युती सरकारने 5 वर्षांत 50 हजार कोटी रुपये दिले. 

605 अभ्यासक्रमांत शुल्क माफ

राज्य सरकारने ओबीसींसह सर्वच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्यांना 605 अभ्यासक्रमांत शुल्क माफ केले आहे. विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमात दीड हजार जागा वाढविल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 10 टक्के आरक्षण दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.