Sat, Jul 04, 2020 04:02होमपेज › Vidarbha › साहित्य संमेलनातील वादात आणखी भर

साहित्य संमेलनातील वादात आणखी भर

Published On: Jan 10 2019 1:46AM | Last Updated: Jan 10 2019 1:35AM
नागपूर : प्रतिनिधी

92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. ऐनवेळी त्यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.साहित्य संमेलनात सुरू असलेल्या वादात त्यांच्या राजीनाम्याने आणखी भर पडली आहे. 

महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांच्याकडे आपण राजीनामा पाठविला असल्याचे स्वत: डॉ. जोशी यांनी पत्रकारांना सांगितले. जोशी म्हणाले की, ज्यांची चूक आहे ते ती मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले. ही माझी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी कुठल्याही डाव्या-उजव्या विचारसरणीचा नाही, तरीही माझ्यावर सगळ्या आरोपांचे खापर फोडले गेले. आयोजक जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. माझ्यावर अनेक मर्यादा होत्या, असे ते म्हणाले.

नयनतारा सहगल या उच्चकोटीच्या लेखिका आहेत. त्यांच्याबद्दल गैरसमज करून वाद उभा करण्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे, असे सांगून जोशी यांनी आपण नयनतारा सहगल यांची भेट घेऊन माफी मागणार असल्याचेही सांगितले. सहगल आल्या तर संमेलन निर्विघ्नपणे पार पडणार नाही, असे म्हटले गेले. मात्र, त्यांचे निमंत्रण रद्द झाल्यानंतरसुद्धा संमेलन यशस्वी करण्यापेक्षा त्यात वाद घालण्यात येतो, हे मला पटणारे नाही. म्हणून मी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिल्याचे ते म्हणाले.

साहित्य संमेलनाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

नागपूर : वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या  92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि संमेलनाचे उद्घाटन एकाच दिवशी असल्याने आयोजकांची चिंता वाढली आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणांकडे सार्‍यांचे लक्ष  लागले होते. मात्र,  मुख्यमंत्रीही संमेलनाला येत नसल्याने आयोजकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.