होमपेज › Vidarbha › दारुबंदीसाठी महिलांचे सौ. मुख्यमंत्र्यांना साकडं

दारुबंदीसाठी महिलांचे सौ. मुख्यमंत्र्यांना साकडं

Published On: Nov 14 2017 9:57AM | Last Updated: Nov 14 2017 10:02AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची अनेक आंदोलने होऊनही निर्णय घेण्यात आला नाही. म्हणून जिल्ह्यातील काही महिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या नावे पत्र लिहून ‘दारू मुळे होणारे आमचे संसार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालायला सांगा,’ असे आवाहन केले.

स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे. मात्र त्याची दखल घेण्यात येत नाही. म्हणून स्वामिनीच्या आंदोलक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला पत्र लिहून आपल्या वेदना कळविल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांतून दहा हजार महिलांनी हे पत्र लिहिले असल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. अनेक महिलांनी या पत्रातून दारूमुळे आपल्या संसाराची होणारी वाताहत मांडली आहे. 

स्वामिनीचे मुख्य निमंत्रक महेश पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्हा दारूमुक्‍त होण्यासाठी आंदोलन सुरू आहे. तरुण पिढी दारूच्या विळख्यात सापडली आहे. महिला संसार चालविण्यासाठी दिवसभर शेतात मजुरी करून घरी परत येतात. त्या वेळी तिचा पती मजुरीचे पैसे घेऊन तिला मारहाण करतो. इतके विदारक चित्र जिल्ह्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

आदरणीय अमृताताई,

पत्र लिहिण्यास कारण की, यवतमाळ जिल्ह्यातील आमच्या घरात-दारात दारूने थैान घातले आहे. तुझ्यासारखी अखंड सौभाग्यवती राहण्याची माझी इच्छा आहे. पण, ही दारू आमचे सौभाग्य केव्हा हिरावून घेईल याची काही खात्री उरली नाही. राज्याचे मुख्यमंत्री असलेले तुझे पती यांना सांगून आमच्या जिल्ह्यात दारूबंदी करून घे. तुझ्यासारखे अखंड सौभाग्य आम्हास मिळू दे.