Sat, Aug 24, 2019 09:58होमपेज › Vidarbha › नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, विधानपरिषदेचे कामकाज अवघ्या ७ मिनिटात गुंडाळले 

नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, विधानपरिषदेचे कामकाज अवघ्या ७ मिनिटात गुंडाळले 

Published On: Jul 06 2018 7:42PM | Last Updated: Jul 06 2018 7:42PMनागपूर : प्रतिनिधी

वरुण राजाने आज नागपूर नगरीवर कृपादृष्टी दाखवत शहराला अक्षरश: धू-धू धुतले. काल रात्री सुरू झालेल्या पावसाने आज पहाटेपासून प्रचंड जोर धरला. जोरदार पावसामुळे नागपुरचे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाजही विधानभवनाच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. यामुळे विरोधकांनीही पावसासोबत सरकारला धोपटून काढण्याची संधी सोडली नाही.

काल रात्रीपासून आज सायंकाळपयरत 24 तासात जवळजवळ 400 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. परिणामी शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. विशेष म्हणजे शहरातील नाले आणि पाणी निचरा होण्याच्या व्यवस्थाकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने पाण्याचा निचरा होण्यास कोणताच मार्ग नव्हता. परिणामी वरुन कोसळणारा पाऊस आणि वाहून जाण्यास जागा नसल्‍याने साचलेले पाणी यामुळे परिस्थिती जास्तच गंभीर झाली.

अनेक सखल वस्त्यांमध्ये घराघरात पाणी शिरले. काही ठिकाणी हे पाणी कमरेइतके चढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून शहराकडे येणारा वर्धा रोड आज पूर्णत: पाण्याखाली होता. तर काहीसा खोलगट असलेल्या नरेंद्रनगर रेल्वेपुलाखालून जाणार्‍या रस्त्यावर सिटीबसच्या खिडकीपर्यंत पोहोचेल इतके पाणी साचले होते. रविभवन या मंत्री आणि उच्च पदस्थांच्या शासकीय विश्रामगृह परिसरातील अनेक कॉटेजेसमध्ये तळमजल्यावरील खोल्यांमध्ये पाणी शिरले. माझ्या कॉटेजमध्ये पाणी शिरल्याने काम करणे शक्‍य झाले नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज केला. विधानभवनाच्या तळघरातही पाणी शिरल्याने त्या ठिकाणी असलेल्या महावितरणच्या ट्रांसमीटरला धोका निर्माण झाला. संभाव्य दुर्घटना टाळ्ण्यासाठी शेवटी विधानभवनाचा वीजपुरवठाही बंद करावा लागला अशी माहिती सुत्रांनी दिली. या पावसामुळे अनेक झोपडपटट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तिथल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. 

आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाणी साचल्यामुळे एक विमान डायर्व्हट करण्यात आले. जागोजागी आणि शहरातील प्रत्येक चौकाचौकात पाणी साचल्यामुळे चारचाकी गाड्या, दुचाकी, स्कूल बसेस पाण्यात फसल्या होत्या. शेवटी नागरिकांनी एकमेकांना मदत करून गाड्या बाहेर काढल्या. शहरात अनेक खोलगट भागात बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यामुळे शहरातील विविध भागातील विद्युतपुरवठा खंडित करावा लागला.

विधानपरिषदेचे कामकाज अवघ्या ७ मिनिटात गुंडळले 

विधानपरिषदेचे कामकाज अवघ्या ७ मिनिटात गुंडळले, परिणामी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर तोंडसुख घेतले. आज दुपारी 12 वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले तेव्हा सभापती रामराजे नाईक निंबाळकर आसनस्थ होते. पावसामुळे विधानभवनच्या विजेचा झालेला घोळ विरोधकांनी सरकारच्या लक्षात आणून देण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. काल विधानसभेत मुंबईतील सिडकोच्या जमिनीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यावर राज्य सरकारने घोषित केलेल्या न्यायालयीन चौकशीच्या दरम्यान अशा जमिनींच्या सर्व व्यवहारांना स्थगिती दिली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळाच्या परिसरातील महावितरणचे ट्रांसफार्मर पावसामुळे पाण्याखाली आल्याने निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यावर केलेल्या उपाययोजना याबाबत निवेदन केले. या प्रकाराबद्दल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नाराजी व्ये केली. यानंतर लगेचच सभापतींनी कामकाज तहकूब करीत असल्याचे घोषित केले.