Wed, Oct 16, 2019 10:06होमपेज › Vidarbha › दारू तस्करांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले

दारू तस्करांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले

Published On: Nov 06 2018 1:57PM | Last Updated: Nov 06 2018 1:57PMनागपूर : पुढारी ऑनलाईन 

राज्याचे  वित्त, नियाजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या  प्रयत्नांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली होती. मात्र आज दारुबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून अवैध दारुची वाहतूक करणाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले. उपचारादरम्यान त्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चंद्रपूरमध्ये दारुबंदी असल्याने तेथे मोठ्याप्रमाणावर अवैध दारुची तस्करी होत असते. एका स्कॉर्पिओ गाडीतून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून नागभीड पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे पोलीसांनी आज सकाळी मौशी-चोरगावजवळील गोसी खुर्द कालव्याजवळ सापळा रचला होता. स्कॉर्पिओ तेथे येताच पोलिसांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात पोलीस उपनिरीक्षक चिडे चिरडले गेले. 

गाडी थांबविण्यास सांगूनही स्कॉर्पिओ न थांबविल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला. त्याचवेळी स्कॉर्पिओ गाडी पुढे जाणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झाल्याने गाडी थांबलेली पाहून पोलीस त्या गाडीकडे सरसावले, मात्र त्याचवेळी या तस्कराने प्रचंड वेगात गाडी पोलिसांच्या अंगावर घातली. यावेळी इतर पोलिस सावध असल्याने कोणालाही दुखापत झाले नाही मात्र या अपघातात चिडे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहगलवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.