होमपेज › Vidarbha › नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची सत्त्वपरीक्षा

नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची सत्त्वपरीक्षा

Published On: Jul 04 2018 2:23AM | Last Updated: Jul 03 2018 11:25PMनागपूर : उदय तानपाठक 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपुरात बुधवारपासून (ता. 4) सुरू होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्त्वपरीक्षा होणार आहे. अनेक पातळ्यांवर त्यांना लढावे लागणार आहे. सोमवारीच काँग्रेसने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले आहेत, तर विरोधकांबरोबरच सरकारमधील शिवसेना अधिक आक्रमक झाल्याने ते आणखी एक आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे या सर्वांवर ते कशी मात करतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. 

मुंबईतील मनोरा या आमदार निवासाची पुनर्बांधणी तसेच अन्य अनेक कारणांमुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, असा प्रस्ताव सरकारने मांडला. त्यास शिवसेनेसह विरोधकांचा विरोध होता. मात्र, त्यांची समजूत काढून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. 

अर्थात, त्याचा राजकीय फायदा ते आणि त्यांचा पक्ष उठवतीलच. मात्र, आजपासून सुरू होणार्‍या या अधिवेशनात विरोधकांच्या हाती  सरकारविरोधी बराच मालमसाला असल्याने हा निर्णय प्रतिकूल ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची योजना आणली, तरी त्यांच्या आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत. 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर झाली; पण प्रत्यक्षात 14 हजार कोटीच शेतकर्‍यांच्या पदरात पडले आहेत. बँकांचा असहकार आणि बरीच कारणे ही योजना रेंगाळण्यामागे असल्याचे सांगितले जाते. काहीही असले, तरी विरोधक सरकारला धारेवर धरतील, हे नक्‍की. मात्र, त्यांना शिवसेनेची सभागृहातही साथ मिळते की, सेनेचा विरोध सभागृहाबाहेरच राहतो, हे पहावे लागेल. 

शेतकर्‍यांना हमीभाव द्यावा, अशी मागणी विरोधकांसह शेतकर्‍यांचे अनेक नेते करीत आहेत. याबद्दलचा निर्णय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जाहीर केल्याने त्यावरून फारसे वादंग होणार नाही. नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असून, नारायण राणे यांनीदेखील कधी नव्हे तो सेनेच्या सुरात सूर मिसळला आहे. अधिवेशनात हा मुद्दा सेनेने काढावा, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्न करतीलच. त्यास किती यश येते, हे पहावे लागेल. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोमवारीच काँग्रेसने सिडकोच्या भूखंडाचा घोटाळा झाल्याचा आणि त्यात मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. एरव्ही संजय निरुपम यांना कुणी फारसे गांभीर्याने घेत नसल्याने हा आरोप करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साथीला घेतले असावे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भष्टाचार, गैरव्यवहारांचे आरोप गेल्या चार वर्षांत झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा प्रकारचा आरोप अभावानेच झाला होता. आता तो झाल्याने साहजिकच काँग्रेस सभागृहात आक्रमक होईल; पण त्यास राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची साथ मनापासून मिळते की, मुख्यमंत्री आपला राजकीय चाणाक्षपणा  वापरून या आरोपातली हवाच काढून घेतात, हे पहावे लागेल. 
या पार्श्‍वभूमीवर बुधवारपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात मुख्यमंत्री बाजी मारणार की, विरोधक सरकारला जेरीस आणणार, याची कसोटी लागेल.

बुधवारी पहिल्याच दिवशी दिवंगत मंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहून कामकाज स्थगित होईल, तर परवा गुरुवारी गदारोळातच पुरवणी मागण्या मांडल्या जातील. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस गदारोळातच जातील. सोमवारपासून खर्‍या अर्थाने अधिवेशन सुरू होईल.