होमपेज › Vidarbha › अयोध्येतील राम मंदिर लढ्याची ठरणार दिशा

अयोध्येतील राम मंदिर लढ्याची ठरणार दिशा

Published On: Nov 11 2018 1:57AM | Last Updated: Nov 10 2018 11:27PMनागपूर : प्रतिनिधी

अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी कायदा करा, असा सल्ला देणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता मंदिरासाठी जनआंदोलनाची तयारी केली आहे.  संघ परिवारातील संस्थांनी येत्या 25 नोव्हेंबर रोजी रेशीमबागेत जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत राम मंदिर निर्मिती लढ्याची दिशा ठरणार आहे.

देशभरात सध्या राममंदिर निर्मितीची चर्चा सुरू झाली आहे. संघाने विजयादशमीच्या सोहळ्यात ‘कायदा करा, मंदिर बनवा’ असे आवाहन केले होते. शिवसेनेनेदेखील दसरा मेळाव्यात अशीच भूमिका घेतली होती. उत्तर प्रदेशात संत महंत मंदिर निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने फैजाबादचे नामकरण अयोध्या असे केले. तसेच भव्य राममूर्ती निर्मितीचा निर्णय घेतला आहे. शिवसेना अयोध्येत जाऊन राम मंदिर निर्मितीसाठी आंदोलन करणार आहे. याच दरम्यान विश्‍व हिंदू परिषदेतील बंडखोर डॉ. प्रवीण तोगडिया यांनीही एल्गार पुकारलेला आहे.

या पार्श्‍वभूमीवर संघभूमी असलेल्या नागपुरात संघ परिवारातील विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल अशा संघटना एकत्र आल्या असून, त्यांनी मंदिर निर्मितीचा बिगुल फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर मंदिर निर्मितीसाठी अध्यादेश काढला जाण्याची तयारी दिसत नसल्याने, हिंदुत्ववादी संघटना राम मंदिराचा मुद्दा प्रभावीपणे पुढे करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघ परिवारातील संघटनांनी 25 नोव्हेंबर रोजी रेशीमबाग परिसरातील ईश्‍वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत साध्वी ऋतंभरा प्रमुख वक्त्या आहेत. पूर्व विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांतून या सभेसाठी लाखभर कार्यकर्ते येतील, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. ही सभा मंदिर निर्मितीच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी घेणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यात मंदिर निर्मितीच्या घोषणेचा बिगुल फुंकला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.