होमपेज › Vidarbha › बाराव्या उमेदवाराचा अर्ज दाखल, विधानपरिषद निवडणुकीत चुरस

बाराव्या उमेदवाराचा अर्ज दाखल, विधानपरिषद निवडणुकीत चुरस

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:35AMनागपूर : प्रतिनिधी

पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता चुरशीची झाली आहे. परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज भाजपकडून देशमुख यांच्यासह पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून डॉ. मनीषा कायंदे आणि अनिल परब तर काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि वजाहत अख्तर मिर्झा यांनी अर्ज दाखल केले.

राष्ट्रवादीकडून बाबा जानी दुर्राणी यांनी अर्ज दाखल केले. शेकापकडून जयंत पाटील यांनीही अर्ज दाखल केला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या संख्याबळानुसार उमेदवार आधी जाहीर केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र, भाजपने पृथ्वीराज देशमुख यांनाही उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. अकराव्या जागेसाठी प्रयत्नशील असलेले शेकापचे जयंत पाटील यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 25 मते आवश्यक आहेत. त्यानुसार भाजपच्या पाच, शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीची एक आणि काँग्रेसच्या दोन जागा निश्‍चित मानल्या जात आहेत. तर अपक्ष, समाजवादी पक्ष, एमआयएम यांच्या मतांच्या जोरावर जयंत पाटील यांनी निवडून येण्याची तयारी केली आहे. मात्र, भाजपने काही अतिरिक्‍त मतांचा जोर लावल्यास भाजपची जागा निवडून येण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवसांचा अवधी असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, इतर उमेदवारांचे अर्ज कदाचित रद्द झाल्यास एक जागेवर पक्षाचा दावा कायम रहावा यासाठी देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आल्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.