Wed, Jul 15, 2020 22:35होमपेज › Vidarbha › ‘तिच्या‘ मतदानाने वाढवली लोकशाहीची ‘उंची’

‘तिच्या‘ मतदानाने वाढवली लोकशाहीची ‘उंची’

Published On: Apr 12 2019 2:12AM | Last Updated: Apr 12 2019 1:46AM
नागपूर : वृत्तसंस्था

लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी झाले. नागपूरमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेने यांनी मतदानाचा हक्‍क बजावून लोकशाहीची उंची वाढविली. 

नागपूर लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या एका मतदाराला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. हा मतदार होता जगातील उंचीने सर्वात छोटी महिला ज्योती आमगे या. ज्योती आमगे यांची उंची आहे अवघी 63 सेंटीमीटर. लाल रंगाची चेक्सयुक्त स्लीव्हलेस ड्रेस परिधान केलेल्या या दोन फूट एक इंच इतक्या उंचीच्या ज्योती आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. मतदानानंतर शाई लावलेले बोट उंचावत ज्योतींनी मीडियासमोर पोझ दिली. यावेळी त्यांनी सर्व मतदार नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. लोकांनी पहिल्यांदा मतदान करावे आणि मग आपापली इतर कामे करावी, असे आवाहन करताना त्या म्हणाल्या. 

हरहुन्नरी ज्योती...

आमगे यांनी 253 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान केले. विशेष म्हणजे मतदार यादीत आपले नाव पाहण्यासाठी, तसेच कागदपत्रे, ओळखपत्र दाखवण्यासाठी आमगेंना थेट कर्मचार्‍यांच्या टेबलावरच उभे राहावे लागले. आमगे या एका सेलिब्रिटी कुक आणि उदयोजिका आमगे या टीव्ही शो ’बिग बॉस-6’मध्ये दिसल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अमेरिका आणि इटालीतील टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. लोणावळ्याच्या व्हॅक्स संग्रहालयात त्यांचा पुतळाही आहे.