Mon, Dec 09, 2019 18:54होमपेज › Sports › श्रीलंकेसमोर इंग्लंडचे आव्हान

श्रीलंकेसमोर इंग्लंडचे आव्हान

Published On: Jun 20 2019 10:31PM | Last Updated: Jun 21 2019 1:11AM
लीडस् : वृत्तसंस्था 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध  गेल्या सामन्यात 87 धावांनी पराभव स्वीकारावा लागणार्‍या श्रीलंकन संघाची गाठ क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील पुढील सामन्यात शुक्रवारी यजमान इंग्लंड संघाशी होणार आहे. स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये चार गुण मिळवत श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे व उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे झाल्यास संघाला चारही सामने जिंकावे लागतील. 1996 साली जेतेपद मिळवणार्‍या श्रीलंकन संघाला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले व त्यांचे दोन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर बाद फेरीत जागा निश्‍चित करायची झाल्यास श्रीलंकेला इंग्लंडला पराभूत करावे लागेल.

इंग्लंडचा संघ पाच सामन्यांमध्ये चार विजय मिळवत गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धचा पराभव सोडल्यास संघाने आतापर्यंत चमक दाखवली आहे. इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या या संघाच्या फलंदाजांनी चमक दाखवली. संघाने पाच सामन्यांमध्ये चार वेळा 300 हून अधिकची धावसंख्या उभारली. बांगला देशविरुद्ध 6 बाद 386 तर, अफगाणिस्तानविरुद्ध 6 बाद 397 अशी विशाल धावसंख्या उभारली. सर्वाधिक धावा करणार्‍या दहा फलंदाजांमध्ये इंग्लंडच्या पाच फलंदाजांचा समावेश आहे. इंग्लंडच्या पाच फलंदाजांनी शतक झळकावले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात इयान मॉर्गनने 71 चेंडूंत विक्रमी 17 षटकार व चार चौकारांच्या जोरावर 148 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला रोखण्याचे आव्हान नुवान प्रदीप व लसिथ मलिंगा यांच्यावर असणार आहे. श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चमक दाखवावी लागेल. न्यूझीलंडविरुद्ध संघाने 14 धावांच्या आतच पाच विकेटस् गमावले होते. तर, अफगाणिस्तानविरुद्ध संघाने 36 धावांत सात विकेट गमावले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा संघ 3 बाद 205 अशा चांगल्या स्थितीत होता. मात्र, पूर्ण संघ 247 धावसंख्येवर बाद झाला. दिमुथ करुणारत्नेच्या संघाला जोफ्रा आर्चर व मार्क वूड यांच्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल.