Mon, Jun 17, 2019 10:32होमपेज › Sports › धोनीचा ‘बॅकअप’ म्हणून पंतला संधी

धोनीचा ‘बॅकअप’ म्हणून पंतला संधी

Published On: Oct 12 2018 12:48AM | Last Updated: Oct 11 2018 11:15PMमुंबई : वृत्तसंस्था

भारत विरुद्ध विंडीज या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात महेंद्रसिंग धोनीचा ‘बॅकअप’ म्हणून ऋषभ पंत यालाही संधी देण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी याच्या खेळावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे धोनीऐवजी ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यात येईल, अशा चर्चा रंगल्या होत्या; पण आज जाहीर करण्यात आलेल्या संघात धोनीला संघात कायम ठेवून ऋषभलाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे. दिनेश कार्तिकला मात्र कसोटी पाठोपाठ वन-डे संघातूनही वगळण्यात आले आहे.

कर्णधार विराट कोहली यालादेखील या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली होती; परंतु या चर्चा फोल ठरल्या. विराट कोहली याला या मालिकेसाठी आपल्या कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेत कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात आले होते; पण या मालिकेसाठी आता तो उपकर्णधारपदी कायम आहे. याशिवाय, आशिया चषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खलील अहमद या वेगवान नवोदित गोलंदाजालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.

संघात रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव या तीन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दूल ठाकूर या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. धोनीबरोबरच ऋषभ पंतचा समावेश या संघात करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम 11 च्या संघात ऋषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनी यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.