Sun, Oct 20, 2019 05:52होमपेज › Sports › वर्ल्डकपमधील कामगिरीचा बीसीसीआय विराट, शास्त्रींना विचारणार जाब 

वर्ल्डकपमधील कामगिरीचा बीसीसीआय विराट, शास्त्रींना विचारणार जाब 

Published On: Jul 12 2019 7:27PM | Last Updated: Jul 12 2019 6:55PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय संघाचे विश्वचषक 2019 मधील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्ठात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका संघाला बसला. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 221 धावांवरच आटोपला. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघातील उणिवा स्पष्टपणे दिसून आल्या. यावरून क्रिकेटच्या जाणकारांनी, माजी क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील संघाच्या कामगिरीबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि सपोर्ट स्टाफला जाब विचारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विश्वचषकातील कामगिरीबाबत बीसीसीआयची प्रशासकीय समिती कोहली आणि शास्त्रींना पाचारण करणार आहे. संघाच्या कामगिरीचा आढावा घण्यासाठी संघ मायदेशी परतल्यानंतर एक आढावा बैठक होणार आहे. यावेळी उपांत्य फेरीतील संघ निवड आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. 

प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय, सदस्य रवी थोडगे आणि महिला सदस्या डायना एडलजी हे तिघे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशी बैठक घेणार आहेत. या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या तयारीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या आतापासूनच तयारीला लागणार आहे. 

दरम्यान, साखळी सामन्यात अव्वल स्थान घेणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य सामन्यात सुमार कामगिरी भोवली. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मधली फळीही कोलमडली. त्यामुळे भारतीय संघास लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. तसेच काही संघ निवड आणि फलंदाजीच्या क्रमवारीबाबत चुकीचे निर्णयांचाही फटका संघास बसल्याची चर्चा सुरू आहे.