Wed, Jun 03, 2020 09:28होमपेज › Sports › रोहितचा डबल धमाका; भारताची मजबूत पकड

रोहितचा डबल धमाका; भारताची मजबूत पकड

Last Updated: Oct 20 2019 4:48PM
रांची : पुढारी ऑनलाईन

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांची येथे सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर केवळ आठ धावांवर तंबूत परतले. पहिल्या षटाकाच्या दुसर्‍या चेंडूवर शमीने डीन एल्गरला विकेटच्या मागे झेलबाद केले. तर, उमेश यादवने त्याच पद्धतीने क्विंटन डी कॉकला बाद केले. दोघांचे झेल वृद्धीमान साहाने पकडले. खराब प्रकाशामुळे सामना थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने २ विकेट्सवर ९ धावा केल्या आहेत. झुबैर हमजा आणि फाफ डु प्लेसिस क्रीजवर आहेत. खराब हवामानाचा फटका बसण्यापूर्वी भारतीय फलंदाजांसह गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेला जोरात बॅकफूटवर आणले आहे. खराब हवामान आणि पावसामुळे दीड तासापूर्वी दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. 

तत्पूर्वी, भारताने चहापानाआधी पहिला डाव ९ विकेट्सवर ४९७ धावांवर घोषित केला. यासह पंचांनी चहाची घोषणा केली. रोहित शर्माच्या २१२ आणि अजिंक्य रहाणेच्या ११५ धावांच्या व्यतिरिक्त, भारताला या धावसंख्येपर्यंत पोहोचविण्यात रवींद्र जडेजाच्या ५१ धावांनीही मोलाचा वाटा उचलला. तसेच  तळाच्या फळीत उमेश यादवने पाच षटकारांसह ३१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून पहिला कसोटी सामना खेळणार्‍या जॉर्ज लिंडेने चार आणि कॅगिसो रबाडाने तीन गडी बाद केले.

भारतीय संघाचा पहिला डाव

भारतीय संघाने ११६.३ षटकांत ९ गडी बाद ४९७ धावा करुन पहिला डाव घोषित केला. सलामीवीर रोहित शर्माने २१२ धावा केल्या तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ११५ धावा केल्या. या दोघांशिवाय रवींद्र जडेजाने ५१ धावा केल्या.

उमेशची फटकेबाजी, १० चेंडूंमध्ये ३१ धावा

उमेश यादवच्या रूपात भारताला ९ वा धक्का बसला. यादवने झटपट व आक्रमक खेळी केली. त्याने केवळ १० चेंडूत ३१ धावा केल्या. त्याने लिंडनला पाच षटकार लगावले. लिंडनेच उमेशला चकववत बाद केले. लिंडनची ही चौथी विकेट होती. 

रविचंद्रन अश्विनच्या रूपात भारताला ८ वा धक्का बसला. अश्विनला पीडने १६ धावांवर झेलबाद केले. तर, रविंद्र जडेजाच्या रूपात भारताला ७ वा धक्का बसला. जडेजाने ५१ धावा केल्या. लिंडने त्याला माघारी पाठवले. १०३.३ व्या षटकात जॉर्ज लिंडेने भारताला सहावा धक्का दिला. त्याने वृद्धिमान साहाचा त्रिफळा उडवला. साहाने ४२ चेंडूत २४ धावा केल्या. 

अजिंक्य बाद, चौथा धक्का...

जॉर्ज लिंडेने ७६ व्या षटकात अजिंक्यला बाद करून भारताला चौथा धक्का दिला. १९२ चेंडूत १७ चौकार व १ षटकाच्या मदतीने अजिंक्य रहाणेने ११५ धावा तडकावल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रविंद्र जडेजासोबत रोहित शर्माने झटपट ६४ धावांची भागिदारी केली. ८८.१ व्या षटकात रोहित २१२ (चेंडू २५५) धांवांवर बाद झाला. त्याला रबाडाने तंबूचा रस्ता दाखवला. 

रहाणेचे ११ वे शतक

रांची कसोटीच्या पहिल्या दिवसाचा आकर्षण बिंदू रोहित शर्माचे शतक ठरले होते. तर आज दुसर्‍या दिवसाचे पहिले सत्र अजिंक्य रहाणे यांच्या नावावर राहिले. रहाणेने पहिल्या दिवशी ८३ धावांपासून आज खेळण्यास सुरुवत केली. प्रत्येकजण रहाणेच्या शतकाची वाट पाहत होता. परंतु, त्याआधी रोहित आणि रहाणेने दिवसाच्या खेळातील सहाव्या षटकात चौथ्या विकेटसाठी दोनशे धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर काही षटकांच्या अंतराने रहाणेने आपले ११ वे शतक पूर्ण केले. 

रोहितची द्विशतकी खेळी 

सलामीवीर रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्याने २५५ चेंडूत २८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २१२ धावा तडकावल्या. रांची येथे खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी त्याने २४९ चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले. रोहितने १५० हून अधिक धावा करण्याची ही तिसरी वेळ आहे.