Sun, Oct 20, 2019 07:08होमपेज › Sports › B'day special: भारताचे ‘पृथ्वी’ क्षेपणास्र

B'day special: भारताचे ‘पृथ्वी’ क्षेपणास्र

Published On: Nov 09 2018 12:42PM | Last Updated: Nov 09 2018 1:06PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

तो आला, त्याने पाहिले आणि तो जिंकून गेला.... अशाच शब्दात ज्याच्या कसोटी पदार्पणाचे वर्णन करावे लागेल असा खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ होय. पृथ्वी आज 19वा वाढदिवस साजरा करत आहे. काही दिवसापूर्वी राजकोट येथे  झालेल्या कसोटीत 18 वर्षीय पृथ्वीने आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणातच शतकी खेळी करून सर्वांचे मन जिंकले होते. 

सर्वात कमी वयात कसोटी पदार्पण करणारा पृथ्वी दुसराच क्रिकेटपटू ठरला. मुंबईकर पृथ्वी शॉने वयाच्या १४व्या वर्षी मुंबईतील शालेय क्रिकेटमधील हॅरिस शिल्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्डसाठी  ३३० चेंडूवर ५४६ धावा केल्या होत्या. दोन दिवस सुरू असलेल्या या समान्यात शॉने ३६७ मिनीटामध्ये ८५ चौकार आणि ६ षटके लगावली होती. पृथ्वी लहान असल्यापासूनच धमाकेदार खेळी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने भारताला १९वर्षाखालील विश्व करंडकाचे नेतृत्व करत विजय मिळवून दिला होता.

शॉच्या स्वभावाची तुलना क्रिकेट जगतात देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरशी केली जाते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कमी सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये पृथ्वी दुसर्‍या स्थानावर आहे. पृथ्वीने प्रथमश्रेणीचे केवळ १४ सामने खेळले आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने १९८९मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करताना प्रथम श्रेणीचे केवळ नऊ सामने खेळले होते.

जानेवारी २०१७ मध्ये प्रथम श्रेणीतील सामन्यात त्याने पर्दापण केले. त्यावेळी त्याने तामिळनाडू विरूद्ध शतक ठोकले. पृथ्वीने बोर्ड प्रेसिडेंट अंतर्गत खेळताना न्यूझीलंड विरूद्ध त्याने ६६ धावांची खेळी खेळली होती. 

कमी वयात कसोटीत अर्धशतक करणार्‍या भारतीय फलंदाजांच्या यादीत पृथ्वी तिसर्‍या क्रमांकावर आहे. पृथ्वीने १८ वर्षे ३२९ व्या दिवशी ही कामगिरी केली. या यादीत १६ वर्षे २१४ दिवसासह सचिन पहिल्या स्थानावर आहे. 

सलामीवीर म्हणून पदार्पणाच्या कसोटीत कमी वयात अर्धशतक करणार्‍या जागतिक फलंदाजांच्या यादीत पृथ्वी पाचव्या स्थानावर. 

पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा पृथ्वी हा १५वा भारतीय क्रिकेटपटू.

कमी वयात कसोटीत शतक झळकावणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय ठरला पृथ्वी शॉ. सचिनने १७ वर्षे ११२ दिवशी पहिले कसोटी शतक झळकावले होते.

कसोटी पदार्पणात वेगवान शतक झळकावणार्‍या फलंदाजांच्या यादीत पृथ्वी तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला. पृथ्वीने ९९ चेंडूत शतक झळकावले.

कमी वयात कसोटीत शतक करणार्‍या जगभरातील फलंदाजांच्या यादीत पृथ्वी चौथ्या स्थानावर आहे.