होमपेज › Sports › यो-यो टेस्टमध्ये विराटला मागे टाकणाऱ्या सरदार सिंगने का घेतली निवृत्ती?

यो-यो टेस्टमध्ये विराटला मागे टाकणाऱ्या सरदार सिंगने का घेतली निवृत्ती?

Published On: Sep 14 2018 5:04PM | Last Updated: Sep 14 2018 5:07PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

गेल्याच महिन्यात झालेल्या यो-यो फिटनेस चाचणीत भारतातील सर्वात फिट समजल्या जाणाऱ्या विराटला मागे टाकणारा हॉकीपटू सरदार सिंगने आज निवृत्तीची घोषणा केली. फिटनेसच्या बाबतीत अव्वल असलेल्या सरदार सिंगने अवघ्या ३२ व्या वर्षी हॉकीला अलविदा केले. 

भारताला इंडोनेशियात नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला कास्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघातला अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार सरदार सिंगने अचानक निवृत्तीची घेषणा केली. सरदार सिंगने काही दिवसांपूर्वीच २०२० ला टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आशियाई चँम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात त्याची निवड न केल्याने त्याने असे पाऊल उचलले असण्याची शक्तता वर्तवली जात होती. पण, याबाबत खुलासा करत सरदार सिंगने आशियाई स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पराभव स्विकारावा लागल्यावर निवृत्ती घेण्याचा विचार मनात आल्याचे सांगितले. यानंतर संघसहकाऱ्यांशी आणि कुटुंबियांशी चर्चा केल्यावर निवृत्तीची घोषणा केली. आता तरूण खेळाडूंना संधी द्यायला हवी असेही तो म्हणाला. 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या या माजी कर्णाधाराला त्याच्या निवृत्तीनंतरच्या भविष्याविषयी विचारले असता त्याने आपण युरोपिय संघांना प्रशिक्षण देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.