Wed, Jun 19, 2019 08:19होमपेज › Sports › हार्दिक-राहुल चौकशी प्रकरणी सीओएमध्ये मतभेद 

हार्दिक-राहुल चौकशी प्रकरणी सीओएमध्ये मतभेद 

Published On: Jan 13 2019 1:42AM | Last Updated: Jan 12 2019 8:57PM
नवी दिल्ली : प्रतिनिधी

टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये महिलांबाबत अनुचित टिपणी केल्याप्रकरणी निलंबित क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांना वाटते. पण, डायना एडुल्जींनी यावर शंका उपस्थित केली आहे. प्रशासकांच्या दोन सदस्यीय समितीमध्ये चौकशीबाबतच मतभेद आहेत.

पांड्या व राहुल यांनी कॉफी विद करण या कार्यक्रमामध्ये महिलांबाबत अनुचित टिपणी केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले. एडुल्जी व राय यांच्यामध्ये ई-मेलवर चर्चा झाली. ज्यामध्ये एडुल्जी यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर प्रकरणातील सुरुवातीच्या चौकशीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. एडुल्जींच्या मते जोहरी स्वतः अशाच प्रकरणात अडकले होते आणि त्यामुळे याची योग्य चौकशी होणार नाही.

एडुल्जी यांच्या उलट राय यांना दुसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यावर भर आहे. कारण, या प्रकरणातील उशीर संघाच्या कामगिरीवर प्रभाव पाडू शकतो, असे राय यांना वाटते.

आपल्याला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी निर्णय घ्यावा लागेल. कारण, खेळाडूंच्या चुकीच्या व्यवहारामुळे संघाला कमजोर करू शकत नाही, असे राय यांनी लिहिले आहे. एडुल्जी राय यांच्या मागणीवर म्हणाल्या की, आपल्याला चौकशी करण्यात घाई करता कामा नये. नाहीतर या प्रकरणात चालढकल केल्यासारखे वाटेल. बीसीसीआयच्या वैधानिक समितीने या प्रकरणी लोकपालच्या नियुक्‍तीची मागणी केली आहे.