Wed, Feb 20, 2019 15:35होमपेज › Sports › FIFA : क्रोएशियाने ६६ वर्षांत झाले नाही ते करुन दाखवले

FIFA2018 : क्रोएशियाने केला ६६ वर्षांनी पराक्रम

Published On: Jul 13 2018 9:26AM | Last Updated: Jul 13 2018 9:26AMमॉस्को : वृत्तसंस्था 

फिफा विश्‍वचषक स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून पुढील चार वर्षे कोणता संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरणार, हे काही दिवसांतच ठरणार आहे. 1998 सालचा वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स संघाने बेल्जियम संघाला नमवीत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. तर, दुसर्‍या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या संघाला 2-1 असे नमवीत क्रोएशियाने अंतिम फेरी गाठल्याने त्यांच्या या पराक्रमाची चर्च सर्व ठिकाणी होत आहे. 1966 नंतर विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणार्‍या इंग्लंडच्या संघाला क्रोएशियाने चांगलाच धक्‍का दिला; पण हे करताना त्यांनी विक्रम बनविले.

विजय का खास आहे 

क्रोएशिया देशाची लोकसंख्या ही 44 लाख आहे. गेल्या 66 वर्षांत विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा कमी लोकसंख्या असलेला देश ठरला आहे.1950 साली उरुग्वेने विश्‍वचषक जिंकल्यानंतर क्रोएशियाचा संघ जगातील सर्वात लहान संघ आहे. संयुक्‍त राष्ट्र संघातील सदस्य देशांपेक्षाही अधिक देशांचा सहभाग असणार्‍या या स्पर्धेत अवघी 44 लाख लोकसंख्या असलेला हा देश अंतिम फेरी गाठणे हे मोठी गोष्ट आहे. यासोबतच क्रोएशियाचा संघ सर्वात कमी क्रमवारी (20 वे स्थान) असलेला संघ आहे, ज्याने अंतिम फेरी गाठली. तसेच, 0-1 अशा पिछाडीनंतरही अंतिम फेरी गाठणारा क्रोएशियाचा संघ हा पहिला संघ ठरला आहे. नायजेरिया, अर्जेंटिना व आईसलँड या ‘ग्रुप ऑफ डेथ’मधून क्रोशियाच्या संघाने बाद फेरीपर्यंत मजल मारत आपली छाप पाडली. उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्क व उपांत्यपूर्व फेरीत रशियाला नमविले. विशेष म्हणजे, क्रोएशियाने बाद फेरीतील प्रत्येक सामना पिछाडीवरून जिंकला आहे.

 20 वर्षांपूर्वीदेखील दाखवली होती चमक 

20 वर्षांपूर्वीदेखील फ्रान्समध्ये आयोजित विश्‍वचषक स्पर्धेत क्रोएशियाने आपली चमक दाखवली होती. वेगळा देश झाल्यानंतर आपला पहिला विश्‍वचषक खेळणार्‍या क्रोएशिया संघाने 1998 साली उपांत्य फेरी गाठली होती. त्यांनी त्यावेळी उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीला 3-0 असे नमविले होते. 1998 सालच्या विश्‍वचषक स्पर्धेत फ्रान्सने क्रोएशियाला 2-1 असे पराभूत केले. 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रोएशियासमोर फ्रान्सचे आव्हान असणार आहे आणि तेही फिफा विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात. त्यामुळे विश्‍वचषक उंचावणारा तो 9 वा संघ बनतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.