Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Sports › ब्लॉग : बुफानचा फुटबॉलला दुर्दैवी निरोप

ब्लॉग : बुफानचा फुटबॉलला दुर्दैवी निरोप

Published On: Nov 15 2017 1:46PM | Last Updated: Nov 15 2017 1:59PM

बुकमार्क करा
रविराज गायकवाड : अराउंड द वर्ल्ड 

 


एखादा खेळाडू निवृत्त होणं, नवं नाही. पण, त्याची निवृत्ती कशी असावी, हे फार महत्त्वाचं असतं. संघाला विजयाचा गोडवा देऊन निवृत्त झालेला खेळाडू आणि पराभवाचे शल्य आयुष्यभरासाठी उरावर घेऊन निवृत्त होणारा खेळाडू. हाच काय तो निवृत्तीमधला फरक. असाच एक गुणी फुटबॉलपटू जड अंतःकरणानं निवृत्त झालाय. इटली फुटबॉल संघात गेली जवळपास १९ वर्षे गोलपोस्टवर भिंतीसारखा उभा राहिलेला  गोलकीपर जियानलुईगी बुफान आपल्याला आता पुन्हा आंतरराष्ट्रीय मैदानावर दिसणार नाही. इटलीच्या २००६ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात मोलाची कामगिरी बजावलेल्या बुफानचे इटलीच नव्हे, तर जगभरात चाहते होते. पण, इटलीचा संघ वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेला अपात्र ठरेल आणि त्याचवेळी बुफान निवृत्ती घोषित करेल. हे त्याच्या चाहत्यांच्या स्वप्नातही नसेल.

वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत स्वीडनकडून १-० असा पराभव पत्करलेला इटलीचा संघ मुख्य स्पर्धेस पात्र ठरू शकला नाही. चार वेळा वर्ल्ड कप विजेता ठरलेला इटली १९५८ नंतर पहिल्यांदाच मुख्य स्पर्धेसाठी अपात्र ठरला. पण, अनेकांना याही पेक्षा बुफानच्या अशा निवृत्तीचे अधिक वाईट वाटत आहे. १९९८ मध्ये राशिया विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलेला बुफान २०१८ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करणार होता. त्याची ही सहावी वर्ल्ड कप स्पर्धा होती.

युरोपीय फुटबॉल संघामध्ये दीर्घ काळ कारकिर्द असलेले अनेक खेळाडू दिसतात. यात गोल कीपर म्हणून इंग्लंडच्या पिटर शिल्टन यांचे नाव आघाडीवर राहील. १९७० ते १९९० या वीस वर्षांत इंग्लंडचे गोलकीपर म्हणून त्यांनी समर्थपणे धुरा सांभाळली. पण, ९० च्या दशकात युरोपमध्ये दोन अतिशय दर्जेदार गोलकीपर उदयास आले. त्यात जर्मनीचा ऑलिवर कान आणि इटलीचा बुफान. जर्मनीच्या संघाचा भक्काम आधारस्तंभ असलेल्या कानला दुदैवाने वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही. २००२ च्या वर्ल्डकपमध्ये जर्मनीला एकमेव गोल स्वीकारावा लागला. तोदेखील अंतिम सामन्यात. ब्राझीलकडून पराभव पत्करल्यानंतर गोल पोस्टला टेकून बसलेला कान आजही आठवतो. त्याच प्रसंगाची आठवण आज बुफानच्या निवृत्तीनंतर झाली. स्वीडन विरुद्धच्या पात्रता फेरीच्या सामन्यात ६१ व्या मिनिटाला जेकब योहाननकडून गोल स्वीकारल्यानंतरच इटली वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले होते. सामना संपल्यानंतर टीमचे कोच जियान पेईरो वेन्चुरा यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडणारा बुफान पाहवला नाही. 

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्याविषयी फुटबॉल जगाताला कुतूहल आहे. या कुतुहलाविषयाची बुफानचा एक किस्सा इथं शेअर जरूर करावासा वाटतोय. एका कार्यक्रमात बुफानने मेस्सीला स्पर्श केला. हा 'आपल्यासारखाच एक सर्वसामान्य माणूस आहे का? याची खात्री करून घ्यायची होती. म्हणून स्पर्श केला,' असा खुलासा बुफाननं दिला होता. मेस्सीच्या असामान्य कर्तृत्वाला बुफाननं अतिशय मिश्कीलपणे दाद दिली होती. बुफानच्या कालच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू गॅरी लाइनकेर यांनी बुफानचा उल्लेख पहाडा एवढा माणूस असा केला आहे. अशा अनेक प्रतिक्रिया येत्या काही दिवसांत आपल्याला पहायला मिळतील. 

इटलीचा संघच नव्हे, तर फुटबॉलच एका वेगळ्या वळणावर आहे. त्याची आर्थिक, सामाजिक कारणे वेगळी आहेत. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकतो. २००६ मध्ये फ्रान्सचा महान फुटबॉलपटू झिदानच्या नाट्यमय रेडकार्डनंतर इटली विजेती ठरली. त्यानंतर इटलीच्या संघाचा आलेख उतरताच दिसत आहे. यंदा भारतात झालेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतही इटलीचा संघ युरोपमधून पात्र ठरलेला नव्हता. यावरूनच तेथील फुटबॉलच्या अवस्थेची कल्पना येईल. आगामी वर्ल्डकपसाठी अमेरिका, नेदरलँड हे संघही अपात्र ठरले आहेत. पण, इटलीची अनुपस्थिती हुरहूर लावणारी असेल.

वीस वर्षे एखाद्या खेळात देशाचं प्रतिनिधित्व करण्याची किमया जगात काही मोजक्याच खेळाडूंना साधता आली आहे. आपल्या क्रिकेट वेड्या भारतात नुकताच आशिष नेहराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप देण्यात आला. नेहराची कारकिर्दही दीर्घकाळ होती. अनेकवेळा तो जायबंदी झाला होता. पण, दीर्घकाळ खेळाच्या मैदानावर राहण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, निष्ठा आणि अपार मेहनतीची गरज असते. बुफान त्याच श्रृंखलेतला खेळाडू होता. त्याने फुटबॉलचा निरोप घेताना संपूर्ण इटलीच्या फुटबॉल चाहत्यांची माफी मागितली आहे. एखाद्या खेळासाठी आयुष्याची वीस वर्षे वेचलेल्या खेळाडूची कारकीर्द मैदानावर अश्रू ढाळत होणे, हे दुदैवीच म्हणावे लागेल.