Tue, Jan 22, 2019 08:06होमपेज › Sports › बेशिस्तपणा नडला; फोगाटांच्या चारचौघी आशियाई स्पर्धेतून बाहेर! 

बेशिस्तपणा नडला; फोगाटांच्या चारचौघी आशियाई स्पर्धेतून बाहेर! 

Published On: May 17 2018 5:50PM | Last Updated: May 17 2018 5:50PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशाच्या ‘धाकड’ गर्ल्स फोगाट बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याचे फोगाट बहिणींचे स्चप्न भंगले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने फोगाट बहिणींच्या बेशिस्तीपणामुळे आशियाई स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय  कॅम्पमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गीता, बबिता, ऋतु आणि संगिता या चौघींही कॅम्पला उपस्थित नसल्याने त्यांची नावे कॅम्पच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे काही महिन्यानंतर होणाऱ्या आशियाई ट्रायलमध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.  याचाच अर्थ त्यांना आशियाई स्पर्धेत देखील सहभागी होता येणार नाही. करण जे कुस्तीपटू कॅम्पमध्ये सहभागी होतात त्यांनाच ट्रायलमध्ये संधी दिली जाते.

महासंघाच्या या कारवाईमुळे येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंडोनिशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे फोगाट बहिणींचे स्वप्नही भंगले आहे. महासंघाने फोगाट बहिणींसह १५ जणांना बाहेरचा रस्ता दाखवणारे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकावर भारतीय कुस्ती संघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आज (१७ मे) स्वाक्षरी केली आहे.

कॅम्पमधून  फोगाट बहिणींसह १५ खेळाडूंची नावे वगळण्यात आली आहेत. यात ऑलिंम्पीक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकचे पती सत्यवर्थ काडीयान यांचेही नाव आहे. सत्यवर्थ यांनी २०१६ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तर २०१४ मध्ये झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक पटकावले होते. हरियाणातील सोनीपत येथील सेंटरमध्ये पुरूष खेळाडूंचा तर महिलांचा कॅम्प लखनऊमध्ये सुरु झाला आहे. १० मे पासून सुरू झालेला हा कॅम्प २५ जूनपर्यंत असणार आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक कुलदीप मलिक यांनी सादर केलेल्या अहवालातनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  

संबंधित खेळाडूंना  कॅम्पमध्ये सहभाग घ्यायचा नव्हता तर त्यांनी आधी तसे कळवायला हवे होते. त्यांच्या जागी आम्ही इतर खेळाडूंना संधी दिली असती. त्या कॅम्पकडे गांभीर्याने पाहत नाहीत. महिला खेळाडू निर्माण करण्यासाठी संघ मेहनत घेत असताना या खेळाडूंचे असे वागणे चुकीचे आहे, असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले. 

या १५  जणांना दिला डच्चू...

ऋतु फोगाट (५० केजी), इंदु चौधरी (५० केजी), संगीता फोगाट (५७ केजी), गीता फोगाट (५९ केजी), रविता (५९ केजी), पूजा तोमर (६२ केजी), मनू (६२ केजी), नंदीनी सलोखे (६२ केजी), रेश्मा माने (६२ केजी), अंजू (६५ केजी), मनू तोमर (७२ केजी), कामिनी (७२ केजी), बबीता फोगाट (५३ केजी), श्रवण (६१ केजी) आणि सत्यव्रत कादियान (९७ केजी)