Wed, Jun 19, 2019 08:51होमपेज › Sports › कॉफीचा 'चटका' : पांड्या आणि राहुलला संघातून वगळले; शुभमन गिल आणि विजय शंकरची संघात वर्णी 

कॉफीचा 'चटका' : पांड्या आणि राहुलला संघातून वगळले; शुभमन गिल आणि विजय शंकरची संघात वर्णी 

Published On: Jan 13 2019 9:11AM | Last Updated: Jan 13 2019 9:11AM
सिडनी : पुढारी ऑनलाईन  

दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण मधून महिलांवर मुक्ताफळे उधळणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलला भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी अष्टपैलू विजय शंकर आणि  फलंदाज शुभमन गिलचा संघात समावेश करण्यात आला. पांड्या आणि राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले होते.  

अॅडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विजय संघात सामील होईल. न्यूझीलंड दौऱ्यासाठीही त्याची संघात वर्णी लागली आहे. दरम्यान, शुभमनचा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.  

करण जोहरच्या कार्यक्रमामध्ये पांड्या आणि राहुलने सहभागी होताना महिलांविषयी अतिशय गलिच्छ भाषा वापरली होती. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून सडकून टीका करण्यात आली. त्यामुळे क्रिक्रेट प्रशासकीय समितीनेही त्यांच्यावर कारवाईचा बडगा  उगारला आहे. कर्णधार विराट कोहलीने सुद्धा गैरवर्तनाला पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 

काल (ता. १२) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३४ धावांनी पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १५ जानेवारीला ॲडलेडमध्ये होणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक आहे.