Wed, Jul 08, 2020 20:44होमपेज › Sports › पाकचे गोलंदाज बॅट घेवून झुंजले पण, अखेर ४१ धावांनी हरले

पाकचे गोलंदाज बॅट घेवून झुंजले पण, अखेर ४१ धावांनी हरले

Published On: Jun 12 2019 3:06PM | Last Updated: Jun 12 2019 11:03PM
टाँटन : पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाच्या ३०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी पुन्हा कच खालला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा डाव २६६ धावात संपवला आणि ४१ धावांनी सामना खिशात घातला. सलमीवीर इमाम-उल-हक (५३), बाबर आझम (३०) आणि मोहम्मद हाफिज (४६) यांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतरही मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. त्यातच कर्णधार सर्फराजची ४० धावांची संथ खेळी यामुळे आवाक्यातील ३०८ धावांचे लक्ष्य पाकला पार करता आले नाही. हसन अली(३२) आणि वहाब रियाझने (४५) दाखवलेल्या झुंजार खेळामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. पण, यांच्या खेळ्या पाकला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने ३ तर स्टार्क आणि रिचर्डसन २ विकेट घेतल्या.  

ऑस्ट्रेलियाच्या ३०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला फखर जमानच्या रुपात पहिला झटका बसला. पॅट कमिन्सने त्याला भोपळाही फोडू दिला नाही. मात्र यानंतर पाकिस्तानने डाव सावरला. बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागिदारी रचली. बाबर आझमने ७ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ३० धावा केल्या. ही जोडी कांगारूंसाठी डोकेदुखी ठरत असतानाच कुल्टर नाईलचा बाऊन्सर सीमापार फटकावण्याच्या नादात बाबर आझम झेलबाद झाला. 

बाबर बाद झाल्यानंतर इमाम आणि हाफिजने पाकिस्तानचा डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागिदारी रचली. इमाम-उल-हकने वर्ल्डकपमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. पण, पॅट कमिन्सने इमामला ५३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पाकच्या मधल्या फळीला गळती लागली.  अनुभवी हाफिज (४७) आणि शोएब मलिक(०) यांनी निराशा केली. ही पडझड कर्णधार सर्फराज अहमद दुसऱ्या बाजून बघत होता. १६० वर ६ फलंदाज माघारी गेल्यानंतर पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार असे वाटत होते. पण, पाकच्या गोलंदाजांनी बॅट हातात घेत झुंज देण्यास सुरुवात केली. 

हसन अलीने आक्रमक फलंदाजी करत १५ चेंडूत ३२ धावांची खेळी करत पाकला २०० पर्यंत पोहचवले. त्यानंतर वहाब रियाझने ४५ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला चांगलाच घाल फोडला. सर्फराज आणि वहाब खेळत असताना पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. या दोघांनी ८ व्या विकेटसाठी ६४ धावांची भागिदारी रचली. पण, ऑस्ट्रेयिलाचा हुकमी एक्का स्टार्कने आक्रमक खेळणाऱ्या वहाबला ४५ धावांवर बाद करत पाकला मोठा धक्का दिला. त्यानंतर आमिरचाही त्रिफळा उडवत पाकचा ऐतिहासिक विजयाच्या आशेवर पाणी फरले. अखेर मॅक्सवेलने कर्णधार सर्फराजची ४० धावांची खेळी संपवत  पाकिस्तानचा २६६ धावात ऑल आऊट केला. 
तत्पर्वी, वर्ल्ड कपमधील १७ व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिरने पहिलेच षटक निर्धाव टाकून ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना चांगलेच सतावले. पण, दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीने स्वैर मारा केल्याने फिंच आणि वॉर्नरवरचा दबाव नाहीसा झाला. त्यानंतर फिंच आणि वॉर्नरने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. दोघांनी १० व्या षटकात ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक धावफलकावर लावले. 

पाकिस्तान विरुद्ध गेल्या पाच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने २ शतके आणि २ अर्धशतके झळकावली होती. आजच्या सामन्यातही तो चांगल्या टचमध्ये होता. त्यात त्याला वॉर्नरही सुरेख साथ देत होता. दरम्यान, १२ वे षटक टकाण्यासाठी आलेल्या रियाझच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न फिंचने केला. त्यामुळे तो २६ धावांवरच पॅव्हेलियनमध्ये पोहचला असता पण, त्याला आसिफ अलीने झेल सोडत जीवनदान दिले. या जीवनदानाचा फिंचने चांगलाच फायदा उचलत अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली.  

अर्धशतकानंतर फिंचने आक्रमक पवित्रा धारण केला. दरम्यान, वॉर्नरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. फिंच आपल्या शतकाच्या जवळ जात असतानाच त्याला मोहम्मद आमिरने ८२ धावांवर बाद करत सलामी जोडी फोडली. या जोडीने २२ षटकात १४६ धावांची सलामी दिली. ही यंदाच्या वर्ल्डकपमधील आतापर्यंतची सर्वात मोठी सलामी ठरली. फिंच बाद झाल्यानंतर वॉर्नरने डावाची सुत्रे हातात घेतली त्याने मॅक्सवेलच्या साथीने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. पण, आफ्रिदीने १० चेंडूत २० धावा करणाऱ्या मॅक्सवेलचा त्रिफळा उडवून कांगारुंना तिसरा धक्का दिला. 

दरम्यान, वॉर्नर १०२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आयपीएलपासून भलत्याच फॉर्ममध्ये आलेल्या वॉर्नरने आपला धावा करण्याचा धडाका वर्ल्डकपमध्ये कायम राखला. पण, शतकानंतर लगेचच शाहीन आफ्रिदीने वॉर्नरला (१०७) बाद करत पाकिस्तानला मोठा दिलासा दिला. वॉर्नर बाद झाला त्यावेळी ऑस्टेलियाच्या ३८ षटकात ४ बाद २४२ धावा झाल्या होत्या. 

स्लॉग ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत कांगारुंच्या धावांचा ओघ कमी केला. अखेरच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाला  ६ विकेट गमावून  ५१ धावाच करता आल्या.  त्यामुळे ऑस्ट्रेलिया ३५० च्या वर जाणार असे वाटत असतानाच पाकने त्यांना ३०७ धावांपर्यंत रोखले. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने भेदक मारा करत १० षटकात २ निर्धाव षटके टाकत ३० धावात ५ बळी घेतले. त्याला शाहीन आफ्रिदीने २ तर हसन अली, वहाब रियाझ हाफिज यांनी प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली.