Sun, Oct 20, 2019 06:26होमपेज › Sports › जोकोव्हिच उपांत्य फेरीत 

जोकोव्हिच उपांत्य फेरीत 

Published On: Jul 12 2019 1:38AM | Last Updated: Jul 11 2019 11:47PM
लंडन : वृत्तसंस्था 

अव्वल मानांकित व चार वेळचा चॅम्पियन असलेल्या नोवाक जोकोव्हिचने ऑल इंग्लंड क्लबमध्ये आपल्या 70 व्या विजयाची नोंद करीत नवव्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोवाकने पहिल्या सेटमध्ये एकदा सर्व्हिस गमावल्यानंतर पुनरागमन केले व बेल्जियमच्या 21 व्या मानांकित डेव्हिड गॉफिनला 6-4, 6-0, 6-2 असे पराभूत केले.  

जोकोव्हिचला फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टा आगुटचा सामना करावा लागेल. 23 व्या मानांकित या खेळाडूने 26 व्या मानांकित गुईडो पेलाला 7-5, 6-4, 3-6, 6-3 असे नमविले. जोकोव्हिचला सुरुवातीला अडथळ्यांचा सामना करावा लागला; पण नंतर त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने शेवटच्या 17 पैकी 15 गेम जिंकले आणि 36 व्या वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

मला तिसर्‍या फेरीच्या सामन्यात आव्हान मिळाले. हा सामना सोडल्यास मी सर्व सामने सरळ सेटमध्ये जिंकलो आणि सर्व स्पर्धेमध्ये मी चांगली कामगिरी केली, असे जोकोव्हिच म्हणाला. गॉफिनने चांगली सुरुवात केली आणि जोकोव्हिचची सर्व्हिस मोडीत काढत 4-3 अशी आघाडी घेतली; पण 16 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता या खेळाडूने यानंतर सलग नऊ गेम जिंकले. दुसर्‍या सेटमध्ये त्याने गॉफिनला आपल्या सर्व्हिसवर केवळ चार गुण मिळवण्याची संधी दिली. तिसर्‍या सेटमध्ये जोकोव्हिचने सुरुवातीला ब्रेक पॉईंट घेत 3-1 अशी आघाडी घेतली आणि सहजपणे सामना जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली.