नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
हार्दिक पांड्याला न्यूझींलंडच्या दौऱ्यावर देखील 'कॉफी विथ करण'चे चटके सोसावे लागले. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पांड्याने चांगल्या खेळीचे प्रदर्शन केले असले तरी चाहत्यांच्या मनावर राज्य करू शकला नाही. अजूनही त्याचे चाहते 'कॉफी विथ करण शो' प्रकरण विसरलेले नाहीत. अनेक चाहत्यांनी ऑकलॅंड येथील सामन्यात त्याला ट्रोल केले आहे.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने न्यूझींलंड विरूद्धच्या टी 20 अंतिम सामन्यात ११ चेंडूवर २१ धावा केल्या आहेत. पण दौऱ्यादरम्यान त्याला पून्हा एकदा कॉफीचे चटके बसले. ऑकलँडच्या मैदानावर झालेल्या सामन्यात एका महिलेने बॅनर दाखवत हार्दिकला ट्रोल केले. या बॅनरवर त्याने कॉफीच्या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वाक्याचा वापर केला होता. 'पांड्या आज करके आय क्या?' असे बॅनर दाखवत पांड्याला ट्रोल केले.
कॉफी विथ करण मधील हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल संदर्भातला शो प्रचंड वादग्रस्त ठरला आहे. सर्वात चांगला फलंदाज कोण या प्रश्नावर राहुलने सचिन ऐवजी विराटचे नाव घेतल्याने सचिनच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली. तर पांड्याने महिलांविरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती.
हे प्रकरण दोन्ही खेळाडूंना चांगलेच भोवले. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बीसीसीआयने तात्काळ निलंबन केले होते. पण २४ जानेवारीला यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि पांड्याला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघात सहभागी करण्यात आले.
हॅमिल्टनच्या मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी20 सामन्यात किवींनी भारताचा ४ धावांनी पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने किवींनी टी20 मालिका २-१ ने जिंकली.