Sun, Oct 20, 2019 05:52होमपेज › Sports › ‘चौथा’ कोण? निवड समितीने दिले ‘तीन’ ऑप्शन 

‘चौथा’ कोण? निवड समितीने दिले ‘तीन’ ऑप्शन 

Published On: Apr 15 2019 6:26PM | Last Updated: Apr 15 2019 7:00PM
अनिरुद्ध संकपाळ : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा आज (दि.१५) करण्यात आली. भारतासाठी सर्वात मोठी अडचण होती ती चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याची. आज निवडसमितीने याची तीन उत्तरे देत बॉल संघव्यवस्थापनाच्या कोर्टात अलगद टोलवून दिला आहे. त्यांनी तिसऱ्या क्रमांकासाठी विजय शंकर, केएल राहुल आणि केदार जाधवचे नाव सुचवले आहे. 

रहाणे-रायडू फेल

भारतीय संघ व्यवस्थापनाने गेले वर्षभर चौथ्या क्रमांकावर बरेच प्रयोग केले. सर्वात आधी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला ट्राय करण्यात आले. त्याने परदेशात काही सामन्यात चांगली कामगिरी केली खरी पण, मायदेशात त्याला फिरकीला सामोरे जाताना अडचणी आल्या. तसेच चांगल्या रनरेटने धावा करण्यातही तो यशस्वी ठरला नाही. त्यामुळे अंबाती रायडूला संधी मिळाली. त्यानेही सुरुवातीच्या काही समन्यात दमदार कामगिरी केली. पण, सध्या त्याचा फॉर्म हरपला आहे. मध्यंतरी मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांनाही संधी मिळाली होती. पण, युवराज सिंगची जागा भरुन काढू शकेल असा फलंदाज काही भारताला मिळाला नाही. 

स्पेशालिस्ट फलंदाजच नाही

ऑलराउंडर शंकर की चौथ्या क्रमांकाचा फलंदाज

विश्वचषकासाठी निवडसमितीने कर्णधार विराटपुढे चौथ्या क्रमांकासाठी तीन ऑप्शन ठेवले आहेत. पहिला आहे तो विजय शंकर ज्याने आतापर्यंत फक्त ९ वनडे सामने खेळले आहेत. शंकरच्या निवडीबाबात निवड समिती गोंधळलेली वाटली. त्यांनी शंकरला ऑल राउंडर म्हणून संघात स्थान दिले आहे का? चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून स्थान दिले आहे याचे उत्तर मिळत नाही. निवडसमितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी यावर शंकर हा गोलंदाजी करणारा फलंदाज असल्याचे सांगितले. पण, असाच एक ऑल राउंडर संघात आहे तो म्हणजे हार्दिक पांड्या. 

ओपनिंग फलंदाज की मधल्या फळीतील ऍडजेस्टमेंट

आता दुसऱ्या ऑप्शन म्हणून केएल राहुलकडे पाहिले तर तो आहे ओपनिंग बॅट्समन. त्याला बॅक म्हणून संघात घेतले आहे की चौथ्या क्रमांकाचा ऑप्शन म्हणून याची स्पष्टता अजून झाली नाही. ती स्पष्टता बहुदा विराट कोहलीच करेल. राहुलने आपल्या करिअरची सुरुवात करताना एकदम धडाक्यात केली होती. त्याने पहिल्यांदा कसोटीत जम बसवला आणि मग वनडे आणि टी २० संघाकडे मोर्चा वळवला. त्याची कामगिरी इतकी चांगली होती की धवनला आपले संघातले स्थान गमवावे लागले. पण, अचानक त्याच्या फॉर्मला ग्रहण लागले आणि त्याने अपयशाची मालिकाच खेळली. दरम्यान, गब्बरने संधी मिळताच दमदार कामगिरी करत संघातले आपले स्थान पुन्हा मिळवले.

त्यानंतर संघातील स्थान टिकवण्यासाठी राहुलचा आटापिटा सुरु झाला. दरम्यान, चौथ्या क्रमांकावरील जागा रिकामी झाली. ऍडजेस्टमेंट म्हणून त्याला मधल्या फळीतील फलंदाज केला गेला. सुरुवातीला त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून दोस्त कर्णधार विराट स्वतः चौथ्या क्रमांकावर येवू लागला. पण, इथे काही त्याचे बस्तान बसले नाही. त्याला वनडे संघातून वगळण्यात आले. आता तर त्याला वर्ल्ड कपचे तिकीट मिळाले आहे. पण, तो संघात खेळेलच याची शाश्वती नाही. जर त्याच्याकडे सलमीवीर म्हणून पाहिले तर तो बेंच स्ट्रेंथच गणला जाईल. त्याला अंतिम अकरात खेळायचे असेल तर त्याला चौथा क्रमांकावर खेळावे लागेल. म्हणजे विराटला पुन्हा एका ओपनिंग बॅट्समनला मधल्या फळीतील फलंदाज बनवावे लागेल. 

केदार ऐन घटकेचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज 

केदार जाधवचा संघात समावेश झाला. त्यावेळी त्याच्याकडे असलेली शॉट व्हारायटी आणि बिनधास्त बॉल सीमापर धाडण्याची क्षमता पाहून त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. आता अचानक त्याला निवडसमितीने चौथ्या क्रमांकाचा फलंदाज करुन टाकला आहे. केदार जाधव देशांतर्गत सामन्यात जरी चौथ्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असला आणि चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये त्याच्याकडे असली तरी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची फार कमी संधी देण्यात आली आहे. 

भारतीय संघात तो सध्या फिनिशरचा रोल पार पाडत आहे. त्यामुळे त्याची खेळण्याची मानसिकताही तशाच प्रकारची झाली आहे. आता वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत त्याला अचानक चौथ्या क्रमांकावर पाठवणे कितपत संयुक्तिक आहे हा प्रश्नच आहे. तसे बघायला गेले तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाकडे टॉप ऑर्डर ढेपाळली तर डाव सावरण्याची क्षमता असायला हवी. तसेच जर टॉप ऑर्डरने चांगली सुरुवात करुन दिली तर अखेरच्या षटकात फटकेबाजी करत या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या स्कोअरमध्ये करता आले पाहिजे. या दोन्ही क्षमता आपल्याकडे असल्याचे केदारने सिद्ध करुन दाखवले आहे. पण, चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव केदारला कमी आहे हाच एकमेव मुद्दा आहे.