Mon, Jun 17, 2019 10:50होमपेज › Sports › सगळ्यांना बॅकअप पण, फास्ट बॉलर्सना नाही 

सगळ्यांना बॅकअप पण, फास्ट बॉलर्सना नाही 

Published On: Apr 15 2019 7:13PM | Last Updated: Apr 15 2019 7:13PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बीसीसीआयच्या निवड समितीने आज वर्ल्डकपसाठी भारताच्या १५ जणांच्या संघाची घोषणा केली. निवड समितने पाच स्पेशलिस्ट बॅट्समन, दोन ऑल राउंडर, तीन स्पिनर, दोन विकेट किपर आणि तीनच फास्ट बॉलर्सचा समावेश केला आहे. संघावर नजर टाकल्यास सर्वांसाठीच बॅकअप ठेवण्यात आला आहे. पण, या बाबतीत फास्ट बॉलवर अन्याय झाला आहे. निवड समितीने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि भुवनेश्वर कुमार हे तीनच स्पेशालिस्ट फास्ट बॉलर संघात घेतले आहेत. 

यंदाचा वर्ल्डकप हा इंग्लंडमध्ये होत आहे. इंग्लंडमधील वातावरण फास्ट बॉलरांसांठी पोषक आहे. पण, भारतीय संघ इंग्लंडला तीनच फास्ट बॉलर घेवून जाणार आहे. वर्ल्डकपपूर्वी सर्वच भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. ही स्पर्धा दीर्घकाळ चालणार असल्याने या स्पर्धेत खेळाडू जखमी होण्याची शक्यता अधिक असते. याची झलक आपल्याला सुरवातीच्याच सामन्यात आली. मुंबई इंडियन्सकडून खेळणारा जसप्रीत बुमराह जखमी झाल्याने त्याला रेस्ट देण्यात आली. वर्ल्डकपच्या तोंडावर तो जखमी झाल्याने चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. 

जायबंदी होण्याचा धोका सर्वात जास्त फास्ट बॉलरांना असतो. त्यामुळे वर्ल्डकपसारख्या मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेला सामोरे जाताना बॅकअपची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. इंग्लंड सारख्या फास्ट बॉलरना पोषक असणाऱ्या देशात वर्ल्डकप खेळण्यासाठी जाताना फक्त तीन फास्ट बॉलर घेवून जाणे तसे धोक्याचेच वाटते. जरी विजय शंकर आणि हार्दिक पांड्या हे फास्ट बॉलर ऑलराउंडर असले तरी ते स्पेशालिस्ट फास्ट बॉलर नाहीत. जर एखादा स्पेशालिस्ट फास्ट बॉलर खराब खेळला किंवा जखमी झाला तर भारताकडे त्याचा बदली फास्ट बॉलर बेंचवरच नसेल. इंग्लंडमधील वर्ल्डकपमध्ये असे होणे वर्ल्डकपचा सर्वात तगडा दावेदार असलेल्या संघासाठी परवडणारे नाही.