Sun, Oct 20, 2019 06:07होमपेज › Sports › IPL : मुंबईने आरसीबीचा ६ चेंडू ६ विकेट राखून केला पराभव

IPL : मुंबईने आरसीबीचा ६ चेंडू ६ विकेट राखून केला पराभव

Published On: Apr 15 2019 7:52PM | Last Updated: Apr 15 2019 11:40PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आरसीबीने ठेवलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात करणारी मुंबई अखेरच्या षटकात थोडी मंदावली. पण, हार्दिक पांड्याने १९ व्या षटकात तब्बल २२ धावा ठोकून सामना खिशात घातला. त्याच्या १६ चेंडूत नाबाद ३२ धावांच्या खेळीमुळे मुंबईने सामना एक षटक राखूनच विजयाला गवसणी घातली. सुरुवातीला डिकॉकने ४० धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर रोहित शर्मा (२८), सुर्यकुमार यादव (२९) आणि इशान किशन (२१) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळ्या करत विजयाला हातभार लावला. 

आरसीबीने ठेवलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि डिकॉकने ७ षटकात ७० धावांची सलामी दिली. डिकॉकने मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही  त्याला जॉईन झाला. या दोघांनी तडाखेबाज सुरुवात केली. पण, रोहितला या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही. तो २८ धावा करुन बाद झाला. रोहित पाठोपाठ डिकॉकही ४० धावा करुन बाद झाला. 

दोन्ही सलमीवीर माघारी परतल्यानंतर आलेल्या इशान किशनने आल्या आल्या फटकेबाजी सुरु केली. त्याने तीन सिक्स मारत दमदार सुरुवात केली पण, याच फटकेबाजीच्या नादात तो चहलच्या गुगलीवर फसला आणि २१ धावांवर स्टंम्पिग झाला. अशाच प्रकारे सुर्यकुमार यादवही २३ चेंडूत २९धावा करुन आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

सुर्यकुमार यादव बाद झाला त्यावेळी मुंबईच्या १५ षटकात १२९ धावा झाल्या होत्या. त्यानंतर पांड्या बंधू क्रिजवर आले. दरम्यान, आरसीबीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत कृणाल पांड्याला धावांसाठी तरसवले. अखेर तो २१ चेंडूत फक्त ११ धावा करुन बाद झाला. त्यानंतर त्याचा भाऊ हार्दिकने १२ चेंडूत २२ धावांची गरज असताना पवन नेगीच्या एकाच षटकात २ षटकार २ चौकार मारत २२ धावा केल्या आणि सामना एक षटक आणि ६ विकेट राखून खिशात घातला. 

तत्पूर्वी, मुंबईने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बेहरनफोर्डने योग्य ठरवत विराटला ८ धावांवर बाद करत आरसीबीला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. त्यानंतर सलमीवीर पार्थिवने जोरदार काही आक्रमक फटके मारत आरसीबीला चांगली सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या २८ धावांच्या छोटेखानी खेळीमुळे आरसीबी पॉवर प्लेमध्ये ५० धावांपर्यंत मजल मारली पण, हार्दिक पांड्याने त्याचा अडसर दूर करत आरसीबीला दुसरा धक्का दिला. 

आरसीबीचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर डिव्हिलियर्स आणि मोईन अलीने डाव सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागिदारी रचत आरसीबीला १७ व्या षटकात १५० च्या जवळ पोहचवले. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. मोईन अली अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्यानंतर डिव्हिलियर्सने आक्रमक खेळण्यास  सुरुवात केली. 

त्याने ५१ चेंडूत ७५ धावांची धुवाधार खेळी करत आरसीबीला १७० पर्यंत पोहचवले. पण, २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने त्याला रनआऊट केले. त्यानंतर मलिंगाने पाठोपाठ दोन विकेट काढल्याने आरसीबीच्या धावांना ब्रेक लागला. अखेर आरसीबीला २० षटकात १७१ धावाच करता आल्या.