Mon, Jun 17, 2019 10:39होमपेज › Sports › मुंबईकर शार्दुल ठाकूरने पदार्पणातच मैदान सोडले

मुंबईकर शार्दुल ठाकूरने पदार्पणातच मैदान सोडले

Published On: Oct 12 2018 10:21AM | Last Updated: Oct 12 2018 10:57AMहैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात हैदराबाद येथे दुसरी आणि अखेरची कसोटी सुरु आहे. भारताने पहिल्या कसोटीत विंडीजला एक डाव आणि २७२ धावांनी पराभूत केले होते. या कसोटी सामन्यात भारताने संघात एक बदल केला. मुंबईचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरला कसोटी पदार्पण करण्याची संधी दिली. त्याला शमीच्या जागेवर संघात स्थान मिळाले आहे. 

भारताने विंडीज बोरबरच्या कसोटी मालिकेत दोन मुंबईकर खेळाडूंना कसोटी पदार्पण करण्याची संधी दिली. पहिल्या कसोटीत १८ वर्षाच्या पृथ्वी शॉला पदार्पणाची संधी दिली. त्याने या कसोटीत आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत प्रथम श्रेणी सारखेच पदार्पणातच दमदार शतक झळकावले. त्याने १३४ धावांची आक्रमक शतकी खेळी केली होती. आज मुंबईच्याच दुसऱ्या खेळाडूला जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पण, त्याला नशिबाने साथ दिली नाही. त्याने सकाळच्या सत्रात अवघे एक षटक टाकले होते. तो दुसरे षटक टाकत असतानाच चौथा चेंडू टाकून झाल्यावर तो जायबंदी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. 

पदार्पणातच अवघे एक षटक टाकून मैदान सोडावे लागल्याने तो बाहेर जात असताना स्वतःवरच नाराज झालेला दिसला. शार्दुल ठाकूर काही वेळाने मैदानावर परतेल अशी आशा करुया.