Sun, Oct 20, 2019 05:51होमपेज › Sports › WT20 : सिक्सर क्विन ‘हरमनप्रीत’मुळे टीम इंडियाची विजयी सलामी

WT20 : सिक्सर क्विन ‘हरमनप्रीत’मुळे टीम इंडियाची विजयी सलामी

Published On: Nov 09 2018 8:13PM | Last Updated: Nov 09 2018 11:41PMगयाना : पुढारी ऑनलाईन 

भारताचे ४० धावात ३ फलंदाज बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौर आणि युवा रॉड्रिग्जने भारताचा डाव सावरत भारताला १९४ धावा करुन दिल्या. कर्णधार हरमनप्रीतच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पहिल्या सामन्यात  न्यूझीलंडचा ३४ धावांनी पराभव केला. हरमनप्रीतने आपल्या १०३ धावांच्या खेळीत ८ षटकार आणि ७ चौकारांची आतशबाजी केली. तिला मुंबईच्या १८ वर्षीय रॉड्रिग्जने ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी करत चांगली साथ दिली. भारताच्या १९५ धावांचा पाठलाग करताना किवींनी देखील आक्रमक सुरुवात केली. सुझी बेट्सने ६७ धावांची खेळी करत पहिल्या काही षटकात भारताच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. पण, पुनम यादवने पाठोपाठ दोन बळी मिळवत भारताला सामन्यात परत आणले. अखेर भारतीय गोलंदाजांनी किवींचा डाव १६० धावात संपवला. 

भारताच्या १९५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर सुझी बेट्सने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत साहा षटकांच्या पॉवर प्लेमध्ये संघाची धावसंख्या ५० च्या पार नेली. आक्रमक खेळणारी ही सुझी बेट्स आणि ॲना पिटरसनची जोडी हेमलताने फोडली. तिने ॲनाला १४ धावांवर बाद करत किवींना पहिला धक्का दिला. पण, एका बाजूने बेट्सने फटकेबाजी थांवबवली नाही. 

आठ षटकानंतर हरमनप्रीतने चेंडू लेग स्पिनर पुनम यादवकडे सोपवला. तिने कर्णधाराला निराश न करता किवींना सोफी डेव्हिन आणि जेस वेटकिनने असे पाठोपाठ बाद करत दोन धक्के दिले. यामुळे किवींची अवस्था १ बाद ५१ वरुन ३ बाद ७३ अशी झाली. दरम्यान, बेट्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने आपली एकाकी झुंज सुरुच ठेवली. पण, तिला दुसऱ्या बाजूने एकाही फलंदाजाने साथ दिली नाही. किवींची गळती सुरुच होती. अखेर अरुंधती रेड्डीने धोकादायक ठरत असलेल्या बेट्सला ६७ धावांवर बाद केले. हा किवींसाठी मोठा धक्का होता. किवींचा निम्मा संघ ९८ धावांवर माघारी परतला होता. केटी मार्टिनने २५ चेंडूत ३९ धावांची खेळी करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण,  अखेर न्यूझीलंडला ९ गड्यांच्या मोबदल्यात   १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. 

भारताकडून हेमलता पुनम यादव यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले तर राधा यादवने दोन बळी मिळवले. किवींचा ३४ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकात विजयी सलामी दिली.

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारतासाठी हा निर्णय योग्य ठरला नाही. पहिल्या पाच षटकातच भारताचे तीन फलंदाज ४० धावांमध्ये माघारी गेले होते. सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने निराशा केली. अवध्या २ धावा करुन ती परतली. 

पाठोपाठ तीन बाद झाल्यानंतर आलेल्या रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीतने भारताचा डाव सावरला. त्या दोघींनी भारताची पडझड रोखली. दोघींनीही धावगती चांगली ठेवण्यावर भर दिला म्हणून भाराताच्या १० षकटाच्या अखेरीस ८० धावा झाल्या होत्या. रॉड्रिग्जने पूर्ण २० षटके खेळण्याच्या इराद्याने एकेरी आणि दुहरी धावांवर भर दिला. तर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाणाऱ्या हरमनप्रीतने पहिल्यापासूनच षटकारांची आतशबाजी सुरु केली. तिने तिच्या अर्धशतकी खेळीत तब्बल ४ षटकर आणि ३ चौकार मारले. 

मुंबईच्या १८ वर्षीय युवा जेमीमाह रॉड्रिग्जने संधी मिळताच मोठे फटके खेळत आपले ४० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रॉड्रिग्जने कर्णधार हरमनप्रीतला चांगली साथ दिल्याने हरमनप्रीतला तुफान फटकेबाजी करतना आली. पण, रॉड्रिग्ज अखेरच्या षटकात मोठा फटका खेळाण्याच्या नादात ती यष्टीचीत झाली. तिने ४५ चेंडूत ५९ धावा केल्या. 

दरम्यान, बघता बघता हरमनप्रीत कौर शतकाच्या जवळ पोहचली होती. अखेरच्या २० व्या षटकात तिने आपले टी-२० मधील पहिले शतक पूर्ण केले. हरमनप्रीतच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले. हरमनप्रीतने आपल्या १०३ धावांच्या खेळीत तब्बल आठ षटकार आणि ७ चौकार मारले.