नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
दक्षिण कोरियातील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी गुगल एक नवीन डुडल तयार करुन खेळाच्या महोत्सवात एक निराळा रंग भरत आहे. प्योंगचांगमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर सर्च इंजिन गुगलने डूडलच्या माध्यमातून लव्हबर्डसचा नजराणा सादर केला आहे.
गुगलने डूडलमध्ये ह्रदयाच्या आकाराचे दोन पक्षी दाखवले आहेत. विशेष म्हणजे या डूडवर क्लिक केल्यानंतर दोन्ही पक्षी नाचताना दिसतात. दक्षिण कोरियामध्ये सुरु असलेल्या हिवाळी ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर गुगल दररोज नव्या डूडलच्या साक्षीने खेळाच्या सेलिब्रेशनमध्ये भर घालत आहे. यात स्कीइंग, स्नोबोर्डिंग, स्केटिंग, स्की जंपिंग आणि कर्लिंग यासारख्या खेळ प्रकाराचा समावेश आहे.
स्पर्धेच्या सहाव्या दिवशी गुगलने स्नो गेम्स सिलेब्रेशनसोबत ‘व्हॅलेंटाइन डे’ सेलिब्रेशनलाही पसंती दिली आहे. डूडलवर ह्रदयाच्या आकारात दिसणारे पक्षी एकमेकांत दंग होऊन स्केटिंगचाही आनंद घेताना दाखवण्यात आले आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या हिवाळी ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतासह जगभरातील ९० पेक्षा अधिक राष्ट्रांचा सहभाग असून ही स्पर्धा २५ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे.