Sun, Jul 12, 2020 19:28होमपेज › Sports › आमचे चाहते 'असं वागणार' नाहीत : पाक कर्णधार

आमचे चाहते 'असं वागणार' नाहीत : पाक कर्णधार

Published On: Jun 12 2019 12:27PM | Last Updated: Jun 12 2019 1:19PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. येत्या रविवारी हे सख्खे शेजारी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांना भिडणार आहेत. त्यापूर्वीच अप्रत्यक्षपणे टोले लगावण्याचे काम पाकच्या खेळाडूंनी सुरू केले आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण आज म्हणजेच बुधवारी पाकिस्तानचा संघ गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी लय कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. या सामन्यातही स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची चाहत्यांकडून डिवचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने पाकिस्तानी चाहते असे वागणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत अप्रत्यक्षपणे भारतीय चाहत्यांना टोला लगावला.

लंडनच्या ओव्हल मैदानावर रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया झालेल्या सामन्या दरम्यान भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विराटने चाहत्यांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वांना टाळ्या वाजवण्यास सांगितले. असा डिवचण्याचा प्रकार आज होणाऱ्या पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातदेखील घडण्याची शक्यता आहे. 

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला आज होणाऱ्या लढतीत पाकच्या चाहत्यांनी स्मिथ व वॉर्नरला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तु काय करशील असा प्रश्न विचारला. यावर सर्फराज म्हणाला, पाकिस्तानचे क्रिकेट चाहते तसे वागतील असे मला वाटत नाही. ते क्रिकेटवर प्रेम करतात. त्यांना पाठिंबा द्यायला आवडतो आणि त्यांचा खेळाडूंवर जीव आहे.' असे सांगत त्याने अप्रत्यक्षपणे भारतीय चाहत्यांना टोला लगावला.

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती. स्मिथ व वॉर्नर एका वर्षाच्या बंदीच्या कारवाईनंतर राष्ट्रीय संघात परतले, परंतु चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग अजूनही कायम आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची प्रचिती वारंवार पाहायला मिळत आहे.