Wed, Jun 19, 2019 08:35होमपेज › Sports › अँडी मरे का घेतोय ३१ व्या वर्षी निवृत्ती? 

अँडी मरे का घेतोय ३१ व्या वर्षी निवृत्ती? 

Published On: Jan 11 2019 5:58PM | Last Updated: Jan 11 2019 5:58PM
मेलबर्न : पुढारी ऑनलाईन 

विंबल्डन इतिहासात ७७ वर्षानंतर पहिल्यांचा ब्रिटनच्या एका टेनिसपटूने विंबल्डन जिंकण्याचा इतिहास घडवला होता. हा इतिहास घडवला होता तो ३१ वर्षीय अँडी मरेने. त्याचे हे विंबल्डन विजेतेपद खास होते. कारण त्याने हे विजेतेपद रोजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हे दिग्गज खेळत असेल्या काळात जिंकले होते. पण, आता हा ‘सर अँडी’ वयाच्या ३१ व्या वर्षीच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. निवृत्तीबाबतची माहिती त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

ऑस्ट्रेलियन ओपन सुरु होण्यास काही दिवसच राहिले असताना अँडी मरेने निवृत्तीची भाषा करुन सर्वांना धक्का दिला. त्याने पत्रकार परिषदेत भावूक होत, आपण कमरेच्या ( हिप ) दुखण्याने हैराण झालो आहोत. आपल्या खेळण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे  ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा आपली शेवटची स्पर्धा असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला ‘हिपच्या दुखण्यामुळे माझ्या खेळण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक खेळ करता येत नाही. याचा मला त्रास होत आहे. मी या दुखण्यावर मात करण्याचा प्रयत्न केला होता. पण, याचा फायदा झाला नाही.’ 

अँडी मरेला त्याने आपल्या मायदेशात होणारी विंबल्डन स्पर्धा खेळून निवृत्त होण्याविषयी विचारले असता तो म्हणाला ‘मलाही विंबल्डन खेळून थांबणे आवडले असते. पण, खूप दिवसाच्या दुखापतीसह मी अजून चार - पाच महिने खेळू शकेन असे वाटत नाही. ऑस्ट्रेलियन ओपन ही माझी अखेरची स्पर्धा असण्याची शक्यता आहे.’

अँडी मरेने गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधून कंबरेच्या ( हिप ) दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.