Fri, Nov 15, 2019 00:13होमपेज › Sports › #MeTooच्या जाळ्यात मलिंगा; 'या' गायिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप

#MeTooच्या जाळ्यात मलिंगा; 'या' गायिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप

Published On: Oct 11 2018 5:39PM | Last Updated: Oct 11 2018 6:02PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

#MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात जगभरातील महिलांनी आवाज बुलंद केला आहे. या मोहिमेचे लोण बॉलिवूड, राजकारणापासून आता क्रिकेटच्या मैदानावर पोहचले आहे. आता श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा देखील यातून सुटलेला नाही. त्याच्यावर एका महिलेने लैगिंक अत्याचाराचा आरोप केला आहे. 

#MeToo च्या माध्यमातून भारतीय गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी पीडित महिलेच्या वतीने ट्वीट करून मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयपीएल दरम्यान घडलेल्या या प्रकरणाची माहिती उघड केली आहे. पीडित महिलेचे नाव उघड केलेले नाही.

श्रीपदा यांनी शेअर केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये, त्या महिलेवर ओढावलेल्या प्रसंगाची माहिती तिच्या शब्दांत मांडली आहे. ''मी माझे नाव सांगू शकत नाही. काही वर्षापासून मी जेव्हा मुंबईत होते. तेव्हा मी माझ्या मित्राला हॉटेलमध्ये शोधत होते. त्याचवेळी माझ्यासमोर मलिंगा आला. त्याने माझा मित्र आत खोलीत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी खोलीत गेले. मात्र खोलीत कोणीच नव्हते. त्याचवेळी मलिंगाने मला धक्का देत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी हॉटेल स्टाफने दरवाजा ठोठावल्याने आपण खोलातून बाहेर पडले.''

ही घटना आयपीएलमध्ये क्रिकेटर मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना घडली आहे. त्याने आयपीएलमधील ११० सामन्यांत १५४ बळी घेतले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील मलिंगांने सर्वाधिक बळी घेतले आहेत.
या आरोपामुळे मलिंगा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मलिंगाने २०७ एकदिवशीय सामन्यात ३०६ बळी घेतले आहेत. तर ३० कसोटी सामन्यात त्याने १०१ बळी घेतले आहेत.

याआधी श्रीलंका क्रिकेट टीमचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यावर देखील एका एअरहोस्टसने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.