Mon, Nov 20, 2017 17:25होमपेज › Soneri › 'पद्मावती नको, अमरावती, लिलावती काहीही म्हणा'

'पद्मावती नको, अमरावती, लिलावती काहीही म्हणा'

Published On: Nov 14 2017 7:53PM | Last Updated: Nov 14 2017 7:53PM

बुकमार्क करा


मुंबई : वृत्तसंस्था
सध्या दिग्दर्शक संजयलिला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटावरून अक्षरशः रान उठले आहे. गुजरात, राजस्थानसह देशाच्या इतर भागांतही चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणारी आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता प्रख्यात लेखिका शोभा डे यांनी भन्साळी यांना एक अजब सल्ला देऊन नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. एका इंग्रजी वेबसाईटवरील ब्लॉगमध्ये शोभा डे यांनी पद्मावती चित्रपटाचे नावच बदलावे, अशी विनंती केली आहे. 

पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, शोभा डे यांनी ब्लॉगमध्ये अजब सल्ला दिला आहे. त्यांनी भन्साळी आणि त्यांच्या चित्रपटांचे तोंडभरून कौतुक केले आहे. शोभा डे लिहितात, 'भन्साळी हे असामान्य गुज्जू आहेत. ते स्वप्न पाहतात आणि त्यावर विचारही करतात. कोणतरी त्यांना ते स्वप्न पाहण्याचे आणि पडद्यावर साकार करण्याचे पैसे देतात. इतिहासाकडे कोण पाहतंय? आणि लॉजिकही कोण पाहतंय? कोणी स्टार वॉर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय का? पण, बॉस चित्रपटाचे शीर्षक का बदलत नाही? थोडा चिमटा काढा? तुम्ही रामलीला सिनेमाच्या वेळी ते केले होते. आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही चित्रपटाला लिलावती किंवा अमरावती पुष्पवती असे काहीही म्हणू शकता. चितूरला कितूर, बितूर, मितूर म्हणू शकता. कोणाला फरक पडतो? चित्रपटाचा खलनायक तुम्ही बदमाश म्हणू शकता. कोणालाही काहीही वाटणार नाही. घूमर नृत्य अडचणीचे ठरू शकते ते तुम्ही झूमर म्हणू शकता. हा तुमचा सिनेमा असल्याने तुम्ही अगदी आरामात काहीही बदलू शकता. याचा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. पण, तुमच्या रक्तापेक्षा ते फारच कमी मोलाचे असेल आणि आम्हाला सिनेमा पाहण्यापासून वंचित करणारे असेल.