Fri, Jul 19, 2019 15:27होमपेज › Soneri › सुलोचनादीदींवर अन्याय का?

सुलोचनादीदींवर अन्याय का?

Published On: Aug 10 2018 12:33AM | Last Updated: Aug 09 2018 8:28PMबंडा यज्ञोपवित 

लोचनात अपार माया, काळजात पतीसाठी, लेकरांसाठी, दीरांसाठी ममतेची कणव, ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ असं जीवन सुमारे दोनशेंहून अधिक चित्रपटांत वास्तवाचं भान ठेवत जगलेल्या सर्वांच्या लाडक्या आणि रसिकांच्या मनात आदराचं अढळस्थान मिळवलेल्या सुलोचनादीदींनी नुकतंच नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलंय.

शरीर कालमानानुसार आणि वयपरत्वे थकलं, पण मन अजूनही उत्साही, आवाज खणखणीत, वाणी स्पष्ट अशा सुलोचनादीदींनी त्यांच्या रुपेरी कारकिर्दीत असंख्य चित्रपटांत एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. पत्नी कशी असावी, वहिनी कशी असावी, आई कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंदी सिनेमातील मीनाकुमारीच्या तोडीस तोड अशा सुलोचनादीदी.

ज्या काळात सिनेमा, नाटक ही क्षेत्रं सर्वसामान्यांच्या द‍ृष्टीनं सज्जन, सुशिक्षित माणसाचं काम समजलं जात नव्हतं, त्याकाळात कोल्हापूर जवळच्या खडकलाट या खेड्यातून एक तरुणी नाटकात काम करण्यासाठी बाबा तथा भालजींच्याकडे येते, त्यांच्या सूचनेवरून नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्याकडून अभिनयाचे धडे घेते, उर्दू येत नाही म्हणून नाउमेद न होता लतादीदींकडून उर्दू शिकून घेते आणि पाहता पाहता इवल्याशा रोपट्याचे अभिनयाच्या वटवृक्षात रूपांतर होऊन हिंदी-मराठी चित्रपटांत मानाचे स्थान प्राप्‍त करते. सारेच अगम्य आणि अतर्क्य.

चित्रपटातील आई कशी असावी हे ‘मोलकरीण’ व ‘एकटी’ चित्रपटांत त्यांच्या अभिनयात पहावं. पत्नी कशी असावी हे चंद्रकांत मांडरे यांच्यासमवेत किमान चाळीसच्या वर चित्रपटांत पहावं. जिजाऊमाता कशी असेल हे त्यांच्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात अनुभवावं.

आज ‘मदर इंडिया’मधील नायिका म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर नर्गिसचं नांव येतं. मात्र मध्यंतरी असं वाचनांत आलं की, मदर इंडिया चित्रपटाची जुळवाजुळव चालू असताना मेहबूब साहेबांच्या मनात राधाच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा सुलोचनादीदींचंच नाव होतं. तसं जर झालं असतं तर एक मर्‍हाटमोळी अभिनयसंपन्‍न अभिनेत्री मदर इंडिया झाली असती, हे अभिनेत्री नर्गिसने साकारलेल्या भूमिकेचा आदर राखून म्हणावसं वाटतं.

अभिनेत्री लीला चिटणीस यांनी आदमी (दिलीप-वहिदा-मनोज) चित्रपट मधूनच सोडल्यानंतर सुलोचनादीदींना दिलीपसमवेत काम करण्याची संधी मिळाली. “माझ्या वयापेक्षा मोठा असलेला माझा लहान मुलगा” असं ज्याचा दीदी गमतीनं उल्‍लेख करतात त्या देव आनंद समवेत त्या जब प्यार किसीसे होता है, जॉनी मेरा नाम, वॉरंट, आमिर गरीबमध्ये त्याच्या आई बनल्या होत्या.

बिमल राय यांच्या सुजातामध्ये एकूण चार अभिनेत्री महाराष्ट्रीयन होत्या; ललिता पवार, सुलोचना, नूतन व शशिकला. भालजी स्कूल व राजाभाऊ परांजपे स्कूलमधून बाहेर पडलेल्या जवळपास प्रत्येक कलावंताने  हिंदी रुपेरी पडदा सजवला आहे. अशा या अभिनयाने परिपूर्ण अभिनेत्रीला चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणार्‍या दादासाहेब फाळके पुरस्कारापासून अजूनपर्यंत का वंचित ठेवले गेले आहे हे कळण्यास मार्ग नाही. ललिता पवार यांनी देखील हिंदी-मराठी चित्रपटांत पाचशेहून अधिक भूमिका गाजवून त्यांनादेखील दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित रहावे लागले. हा एका द‍ृष्टीने मराठी अभिनेत्रींवर एक प्रकारे अन्यायच झाला, असे  म्हणावे वाटते.