Sun, Nov 17, 2019 12:38होमपेज › Soneri › 'पळशीची पीटी'मधून शिवानी घाटगेची रुपेरी पडद्यावर एन्ट्री

'पळशीची पीटी'मधून शिवानी घाटगेची रुपेरी पडद्यावर एन्ट्री

Published On: Jul 12 2019 3:20PM | Last Updated: Jul 12 2019 3:20PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुमन काकी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या 'लागीरं झालं जी' मधली शिवानी घाटगे आणि शीतलीच्या काकीच्या भूमिकेतील शिवानी आता थेट रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचली आहे. लवकरच सुमन काकी ऊर्फ शिवानी घाटगे 'पळशीची पीटी' या मराठी चित्रपटातून एका नव्या भूमिकेत रंग भरायला सज्ज आहे. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित 'पळशीची पीटी' या चित्रपटातून शिवानी मुख्याध्यापिका माळी बाईंच्या भूमिकेत दिसणार असून येत्या २३ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

नावाप्रमाणेच हटके कथानक असणाऱ्या 'पळशीची पीटी' या चित्रपटाची कथा 'भागी' नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील उदासिन शिक्षणपद्धतीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटात शिक्षकांची भूमिका किती मौल्यवान असते हे या चित्रपटात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'पळशीची पीटी' मध्ये शिवानी हेच सत्य मुख्याध्यापिका माळी बाईंच्या रुपाने उलगडणार आहे. 

या भूमिकेविषयी शिवानी घाटगेने सांगितले आहे की, 'हा माझा पहिलाच चित्रपट असून दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांची मी आभारी आहे की, त्यांनी माझ्यातले कलागुण ओळखले. 'पळशीची पीटी' चित्रपटातील मुख्याध्यापिका माळी मॅडम साकारणे माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मालिकेत मी एका समंजस्य गृहिणीची भूमिका साकारली होती. जी प्रथम कुटूंबाचा विचार करते पण मुख्याध्यापिका माळी हे एक करारी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हाती संपूर्ण शाळेची आणि उद्याच्या होतकरू युवा पिढीची जबाबदारी आहे. थोडं कठीण होतं पण दिग्दर्शकांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे काम बरंच सोप्पं झालं'  

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेल्या 'पळशीची पीटी'मध्ये शिवानी सोबतच अ‍ॅथलेट 'भागी'च्या प्रमुख भूमिकेत किरण ढाणे आणि राहुल मगदूम झळकणार आहे. शिवाय काही कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यात असून लवकरच त्यांची नावे रसिकांसमोर येतील.