पुणे : प्रतिनिधी
अलीकडच्या काळात मराठीमध्ये 'नटसम्राट', 'कट्यार काळजात घुसली', 'सैराट' आणि 'फँड्री' यासारखे अनेक चांगले चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यात आला. मराठी चित्रपटाला चांगले दिवस येत आहेत. चित्रपटाची तुलना नाटकाशी केल्यास चित्रपटात आपण दुसरा टेक घेऊ शकतो. नाटकात फक्त ‘वन टेक’ असतो. त्या ‘वन टेक’ची मला भीती वाटते. त्या भीतीमुळे रंगभूमीवर काम करणे मला नकोसे वाटते, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांनी व्यक्त केली.
'बकेट लिस्ट' या आमागी चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने तिने पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी माधुरी बोलत होती. यावेळी अभिनेता सुमित राघवन, दिग्दर्शक तेजस देऊस्कर उपस्थित होते.
माधुरी म्हणाली की, प्रत्येक महिलेने 'बकेट लिस्ट' तयार करावी. त्यामधून प्रेरित व्हावे, ध्येय निश्चित केल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी ‘ती’ने मार्गस्थ व्हावे. या चित्रपटाचा विषय मला मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण करायला योग्य वाटला. आज मराठी चित्रपट क्षेत्रात आल्यानंतर माहेरी आल्यासारखी भावना आहे, अशी भावना देखील माधुरीने व्यक्त केली.