होमपेज › Solapur › जि. प. सीईओविरुद्ध हक्कभंग 

जि. प. सीईओविरुद्ध हक्कभंग 

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 10:08PMनातेपूते : वार्ताहर

विधान परिषद सदस्य आमदार रामहरी रूपनवर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेली अवमानकारक वागणूक भोवण्याची शक्यता आहे. आ. रूपनवर यांच्या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करून घेत कारवाईची नोटीसही बजावली आहे. 

आ. रामहरी रूपनवर हे शासकीय कामासाठी जिल्हा परिषदेत गेले होते. तत्पूर्वी त्यांनी माळशिरस तालुक्यात होत असलेल्या चुकीच्या विकासकामांबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारूड यांना पत्रही दिले होते. त्याबाबत पुढे काय कारवाई झाली याची चौकशी केली असता,  डॉ. भारूड यांनी पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. आ. रूपनवर यांनी त्यांना त्या पत्राची पोहोच दाखविल्यानंतर न वाचताच पत्र मोघम असल्याचे सांगून उद्दामपणे फेकून दिले होते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भारूड यांनी जाणीवपूर्वक कोणतेही कारण नसताना उद्दामपणे पत्राला मोघम म्हणून पत्रच मिळाले नाही, असे म्हणून पत्राला लेखी उत्तर न देता, मोठ्याने ओरडून, मी आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वारंवार बजावत आमदार व सरकार माझे काहीही करू शकत नाही, असे म्हणाले होते. तुम्ही नवीन अर्ज द्या, असे सांगून हे माझे चेंबर आहे, येथे माझी सत्ता चालते, असे म्हणून विचित्र हावभाव केल्यामुळे आ. रूपनवर यांना नाईलाजाने त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडावे लागले होते.

त्यांच्या दालनात  लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची वागणूक देत आ.रुपनवर यांच्याबाबत कसल्याही प्रकारचा राजशिष्टाचार पाळला नाही. त्यामुळे याबाबत आ.. रुपनवर यांनी  डॉ. भारुड यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग दाखल केला आहे. त्यावर विधिमंडळाचे प्रधान सचिव यांनी तत्काळ नोटीस काढून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. भारुड यांनी राजशिष्टाचार पाळला नाही यासाठी त्यांची चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री व राजशिष्टाचार मंत्री यांनादेखील आ. रुपनवर यांनी निवेदने दिलेली आहेत.