Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Solapur › कायद्याचा केला धंदा, महिन्याकाठी लाखो रुपये कमवितो बंदा

कायद्याचा केला धंदा, महिन्याकाठी लाखो रुपये कमवितो बंदा

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:16PMसोलापूर : महेश पांढरे 

शासनाने सर्वसामान्यांसाठी आणलेल्या योजना आणि विकासकामांत पारदर्शकता राहावी, तसेच सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी शासनाने तरतूद केलेल्या पै आणि पैचा हिशोब सर्वसामान्य लोकांना कळावा, यासाठी देण्यात आलेल्या माहिती अधिकाराचा आता सर्रास गैरवापर होत आहे. एका पठ्ठ्याने या माहिती अधिकाराला आपल्या उत्पन्नाचेच साधन बनवून अनेक अधिकार्‍यांना वेठीस धरुन लाखो रुपये कमविण्याचा धंदाच मांडला असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

सर्वसामान्य लोकांना शासनाने केलेल्या योजना आणि विकासकामांची माहिती मिळावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार लागू करण्यासाठी मोठे उपोषण केले होते आणि त्यांच्या मागणीनुसार शासनाने माहिती अधिकार लागू केला. यामुळे प्रशासनावर लक्ष ठेवण्याचा आणि चुकीच्या गोष्टी पडताळून पाहण्याचा अधिकार या माहिती अधिकार कायद्यान्वये सर्वसामान्य लोकांना मिळाला असला तरी दुसरीकडे मात्र काही मंडळींनी या कायद्याचा आधार घेेऊन कायद्यालाच आपल्या जगण्याचे साधन बनविले असल्याची बाब पुढे आली.

माहितीच्या अधिकाराचा वापर करुन हा पठ्ठ्या अनेक शासकीय कार्यालयांमध्ये विविध योजनांची माहिती मागवितो, तसेच माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास अपिलात जातो. तरी अधिकार्‍यांनी अथवा संबंधित विभागाने दाद न दिल्यास हा पठ्ठ्या उपोषणाला बसण्याची धमकी देतो आणि याचकाळात संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांकडे आणि कर्मचार्‍यांकडे पैशाची मागणी करतो. अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास पुन्हा अपील दाखल करुन कारवाई करण्याची धमकी देत असल्याची माहिती एका शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी माझे नातलग असल्याची बतावणीही हा करत असल्याचे त्यांनी सांगितले असून तुम्हाला त्रास नको असेल तर मला पैसे द्या आणि हा विषय तात्काळ संपवून टाका, असा सल्लाही हा पठ्ठ्या अधिकार्‍यांना देतो. तुम्ही क्लासवन अधिकारी असून तुम्हाला महिन्याकाठी 60 ते 70 हजार रुपये मिळतात.

मात्र मी महिन्याकाठी किमान दीड ते दोन लाख रुपये कमवितो तसेच महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत माझे कामकाज चालते. त्यामुळे आपण कोणाला भीत नसल्याचेही तो जाहीरपणे सांगतो. त्यामुळे या महाभागाच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडे वाटते. मात्र अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी संबंधित कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी अशा ठगास पोलिसांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे अन्यथा अशा लोकांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच जाणार, हे सत्य आहे.

मोठे अधिकारी आपले नातलग असल्याची करतो बतावणी  सोलापूरसह जवळपास सहा जिल्ह्यांत माहिती अधिकार टाकून आपण पैसे कमवित असल्याचे जाहीरपणे सांगून अनेक अधिकारी आपले नातलग असल्याची बतावणी हा पठ्ठ्या करत असतो. तसेच माहिती देणे अशक्य असेल तर तत्काळ पैसे द्या आणि विषय संपवून टाका, असा सल्लाही हा महाभाग देत असल्याने अशांविरोधात आता पोलिस कारवाई करणे अपेक्षित आहे.

मनगटात ब्रेसलेट आणि सर्व बोटांत अंगठ्या असा पेहराव 
अनेक शासकीय कार्यालये आपले कार्यक्षेत्र असणारा आणि आरटीई कार्यकर्ता रुबाबात राहात असून मनगटात जाड सोन्याचे ब्रेसलेट, हातातील सर्व बोटांत सोन्याच्या अंगठ्या आणि पोपटपंची इंग्रजी बोलून आपण कायदेपंडित असल्याचा आव तो संबंधित अधिकार्‍यांवर आणत असल्याचे वर्णन अनेक कार्यालयांतील अधिकार्‍यांनी केले आहे.