Thu, May 28, 2020 13:14होमपेज › Solapur › उजनी धरणातून सोलापूरसाठी भीमा नदीत गुरुवारी पाणी सोडणार

उजनीतून सोलापूरसाठी भीमा नदीत उद्या पाणी

Published On: May 15 2019 6:54PM | Last Updated: May 15 2019 6:54PM
सोलापूर : प्रतिनिधी

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर शहरासाठी उद्या, गुरवारी सकाळी  ६ वाजता पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. चार गाळमोरीतून पाणी सोडण्यात आले असून त्यात आणखी वाढ करत तो ७ ते ८००० क्युसेक करण्यात येणार आहे.

शहर पाणीपुरवठयाचा प्रमुख स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा सोमवारी कोरडा पडला. टाकळी इनटेक वेलमधील पाणी २२ मे पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. या दोन दिवसात उजनी धरणातून पाणी न सोडल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. औज बंधाऱ्यातील पाणी टाकळी इनटेक वेलमध्ये घेतले जाते. औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी इनटेक वेलमध्ये सोमवारी ९ फूट ६ इंच पाणी होते. हे पाणी २२ मे पर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत उजनीतून सोलापूरसाठी १५ मे रोजी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यात बदल करत १६ मे ला उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी औजमध्ये पोहोचण्यास आठ दिवसांचा कालावधी लागतो. 

उजनी धरणातील पाणीपातळी खालावली आहे. उजनी पंपगृहासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलाशयातून दुबार पंपिंग सुरू केले आहे. उजनी पंपगृहातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उजनीतून पाणी सोडण्यास उशीर झाला असता तर शहरावर पाणीटंचाई ओढवणार होती. त्यामुळेच उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आले आहे. 

उजनी धरणाची पाणीपातळी पुढीलप्रमाणे ....

एकुण पाणीसाठा : ४८७.५८५ मी.

एकुण पाणीपातळी : १२२२.२० दलघमी (४३.१६ टीएमसी )

उपयुक्त पाणीपातळी : वजा ५८०.६१ दलघमी 

टक्केवारी  : वजा ३८.२७ %

उजनी धरण वजा ५० टक्केच्या पुढे जाणार

उजनी धरण सद्यस्थितीत वजा चाळीस टक्के पर्यंत आले आहे. आत्ता सध्या सोलापूरकरांसाठी उजनीतून भीमा नदीत चार ते पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी साधारणपणे सात ते आठ दिवस चालू राहणार आहे. सोलापूरकरांसाठी अर्धा टीएमसी गरज असताना उजनीतून सहा ते साडेसहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे उजनीतून साधारणपणे १० ते १२ टक्के पाणी वजा होणार आहे. म्हणजेच उजनीतून सोडलेले पाणी सोलापूर पर्यंत पोहोचेपर्यंत उजनी धरण वजा ५० टक्केच्या पुढे जाणार हे नक्की.