होमपेज › Solapur › आडमजी, मोदी रे-नगर बँक गॅरंटीबाबत नाही बोलले  

आडमजी, मोदी रे-नगर बँक गॅरंटीबाबत नाही बोलले  

Published On: Jan 12 2019 11:52PM | Last Updated: Jan 12 2019 11:45PM
सोलापूर ः प्रतिनिधी

गरिबांच्या घरासाठी तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्ही भाषणात चांगले मुद्दे मांडलेत, पण रे-नगरच्या बँक गॅरंटीबाबत भाषणात एक शब्दही न बोलता पंतप्रधानांनी घोर निराशा केल्याचा टोला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माकपचे नरसय्या आडम यांच्याशी बोलताना लावला. 

आडम यांना शिंदे म्हणाले की,  आम्ही आजही तुमच्याबरोबर असून पुन्हा सत्तेवर आल्यावरही तुमच्यासोबत राहू. कारण रे-नगरचे भूमिपूजन मोदींनी केले असले तरी या प्रकल्पाला मंजुरी काँग्रेसचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीच दिली होती.

हुतात्मा दिनानिमित्त  चार हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळी शिंदे आले होते.  शिंदे यांनी चार हुतात्मे, राजमाता जिजाऊ व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. शिंदे परत निघाले असताना तिथे आडम हेदेखील अभिवादन करण्यासाठी आले होते. याप्रसंगी दोघांनी एकमेकांना नमस्कार करत संवाद साधला. 

आडम यांना उद्देशून शिंदे म्हणाले, तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुमच्या मागणीनुसार पंतप्रधानांनी बँक गॅरंटीसंदर्भात घोषणा करणे अपेक्षित होते. तुम्ही चांगला मुद्दा मांडला. त्यावेळी आडम म्हणाले, माझी टीका ही भाषणापुरतीच होती आणि माझे काम आहे लढणे आणि मी लढत राहणार. त्यानंतर शिंदे म्हणाले,आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत, आताही आहोत आणि भविष्यात सत्ता आल्यावरही तुमच्यासोबतच राहू.  चार हुतात्म्यांच्या साक्षीने दोघांत हसतखेळत संवाद झाला. आडम यांच्याकडून होत असलेल्या रे-नगरला पंतप्रधान मोदी यांनी बँक गॅरंटी देण्याबाबत एक चकार शब्दही न काढल्याचे सांगत शिंदे यांनी कामगारांच्या मनात मोदींचा खोटारडेपणा यशस्वीपणे बिंबवला.