होमपेज › Solapur › सोलापूर : मुलगा, सुनेकडून वृद्धाचा निर्घृण खून

सोलापूर : मुलगा, सुनेकडून वृद्धाचा निर्घृण खून

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 11:35PMसोलापूर : प्रतिनिधी 

पोलिसांत केलेली केस काढून घेऊ नका असे सांगितल्याने एका वृद्धाची मुलगा आणि सुनेने लाकडी दांडा आणि विटेने मारहाण करून निर्घृण हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता मोहोळ तालुक्यातील मोरवंची गावात घडली.

अशोक विश्‍वंभर शिंदे (रा. मोरवंची, ता. मोहोळ) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत मुलगा आणि सून यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, राणी सिकंदर शिंदे (रा. मोरवंची, ता. मोहोळ) यांनी काही दिवसांपूर्वी मोहोळ पोलिसांत अ‍ॅट्रॉसिटीची केस दाखल केलेली आहे. ही केस काढून घेणार असल्याबाबत त्यांनी सासरे अशोक शिंदे यांना सांगितले होते. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेदहा वाजता त्यांच्यामध्ये केस काढून घेण्याच्या कारणावरून कडाक्याचे भांडण सुरू होते. यावेळी अशोक शिंदे हे सुनेच्या अंगावर धावून आले. त्यामुळे त्यांचा मुलगा सिकंदर अशोक शिंदे याने चिडून एका लाकडी दांड्याने अशोक शिंदे यांच्या डोक्यात जोरजोरात मारण्यास सुरुवात केली, तर     राणी शिंदे हिनेदेखील वीट घेऊन त्यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.

या घटनेनंतर त्यांचा मुलगा आणि सून या दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृतदेहाच्या आजूबाजूला क्रताचा सडा पडला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अशोक शिंदे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.
याबाबत मृत अशोक शिंदे यांचा भाऊ वसंत शिंदे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा सिकंदर शिंदे, सून राणी सिकंदर शिंदे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघेही आरोपी पसार असून मोहोळ पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मोहोळचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश बडाख आणि विक्रांत बोधे यांच्या सहकार्याने या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि भोसले हे करीत आहेत. खुनाच्या या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.