Sat, Aug 24, 2019 10:58होमपेज › Solapur › वडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह सुनेस जन्मठेप

वडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह सुनेस जन्मठेप

Published On: May 21 2019 1:50AM | Last Updated: May 20 2019 10:06PM
सोलापूर : प्रतिनिधी

कोर्टातील अ‍ॅट्रॉसिटी व बलात्काराची केस मागे घेऊ नको, असे सांगणार्‍या वडील अशोक शिंदे यांच्या डोक्यात लाकडी दांडका घालून खून केल्याप्रकरणी मुलगा सिकंदर शिंदे व सून राणी शिंदे या दोघांना अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मोहोळ तालुक्यातील मोरवंची गावात राहणारे अशोक विश्‍वंभर शिंदे यांच्या घरात 21 जून 2018 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास अशोक शिंदे याचा मुलगा सिकंदर व सून राणी शिंदे यांच्यात भांडण सुरू होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारा भाऊ वसंत विश्‍वंभर शिंदे हे त्याठिकाणी गेले. त्यावेळी सून राणी सिकंदर शिंदे मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केलेली अ‍ॅट्रॉसिटी व बलात्काराची केस काढून घेते, असे म्हणत होती. त्यावेळी सासरे अशोक शिंदे सून राणी शिंदे हिला केस कशाला मागे घेतेस, सर्व समाजात आमची इज्जत गेली आहे, तू केस माघारी घेऊ नकोस, असे म्हणत होते. त्यावेळी राणी ही केस काढून घेते असे म्हणून जात असताना सासरे अशोक शिंदे तिच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी अशोक यांचा मुलगा सिकंदर याने माझ्या बायकोला का मारता, असे म्हणून लाकडी दांडका उचलला आणि वडील अशोक शिंदे यांच्या डोक्यात घातला. त्याचवेळी राणीनेही अशोक शिंदे यांच्या डोक्यावर वीट फेकून मारली. त्यामुळे अशोक शिंदे रक्‍ताच्या थारोळ्यात खाली पडलेले पाहून सिकंदर व राणी तेथून पळून गेले. गंभीर जखमी अशोक शिंदे यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी भाऊ वसंत शिंदे यांनी 108 नंबरवर फोन करून अ‍ॅम्ब्युलन्स मागविली. त्यावेळी त्यामधील डॉक्टरांनी अशोक शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात मृत अशोक शिंदे यांचा भाऊ वसंत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून आरोपी मुलगा सिकंदर  शिंदे व सून राणी शिंदे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. हा खटला अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश यू.बी. हेजीब यांच्या कोर्टात चालला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्‍तिवाद ऐकून आरोपी सिकंदर अशोक शिंदे (वय 35) आणि सून राणी सिकंदर शिंदे (वय 30, दोघे रा. मोरवंची, ता. मोहोळ) या दोघांना जन्मठेप व  प्रत्येकी 500 रुपयांची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारच्या वतीने एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले.  यात फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व डॉक्टर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यात सरकारच्या वतीने अ‍ॅड. जन्नू, अ‍ॅड. क्यातम यांनी, तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. बायस यांनी काम पाहिले.