Mon, Jul 06, 2020 18:58होमपेज › Solapur › बाबासाहेबांच्या भाषणांनी चेतविली कार्यकर्त्यांत स्फूर्ती

बाबासाहेबांच्या भाषणांनी चेतविली कार्यकर्त्यांत स्फूर्ती

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 14 2018 1:29AMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

मुंबई, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सोलापूरशी सतत संपर्क होता. महाराष्ट्र आणि भारतात जेथे जेथे बाबासाहेबांच्या सभा झाल्या, परिषदा झाल्या तेथे तेथे मन्वंतर घडले. त्यादृष्टीने सोलापूर मागे नव्हते; उलट इतर जिल्ह्यांपेक्षा सोलापूर जिल्ह्यात जास्त क्रांतिकारक घटना घडल्या आहेत. जयंतीदिनी घेतलेला हा वेध.

बार्शीतील ऐतिहासिक घोषणा 
सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्यावेळी बाबासाहेब आले तेव्हा त्यांनी आपल्या भाषणांतून कार्यकर्त्यांत अंगार चेतविला. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा जरी येवला मुक्कामी 1935 साली केली असली तरी 1 मे 1924 रोजी बार्शी मुक्कामी त्यांनी याबाबत आपला मनोदय व्यक्त केला होता. धर्मांतरासंबंधीचे चिंतन ते आधीच करीत होते. धर्मांतर का? आणि कशासाठी? यासंदर्भात समाजात जागृती व मत तयार करण्याची पार्श्‍वभूमी या सभेला निश्‍चितच लाभलेली होती.

सोलापुरातील वतनदार परिषद
26 व 27 नोव्हेंबर 1927 रोजी सोलापुरातील थोरला राजवाड्यात सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यात अस्पृश्यांच्या उन्नतीचा मार्ग काय असू शकतो यासंबंधी मार्गदर्शन केले.स्वावलंबन, वतनांचा त्याग करुन गावच्या गुलामीतून सुटका करुन घ्या, स्वतंत्र व्हा, त्यासाठी स्वतंत्र वसाहती निर्माण करुन निर्भयपणे जगण्याचा मंत्र दिला. आपसांतील मतभेद टाकून एकीने वागा, स्वत:च्या पायावर उभे राहून आपली सर्वांगिण उन्नती करुन घेतली पाहिजे, असा क्रांतीकारी आशावाद निर्माण केला. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मांतराचा ठरावही मंजूर करुन घेतला होता.  6 मार्च 1932 रोजी सोलापूरच्या भेटीत कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश दिला होता.

सोलापूरच्या महार-मांग-चांभार-ढोर-भंगी वगैरे मंडळींनी आपसांत एकी केली पाहिजे आणि कोणाच्या शिकवणीने आपसात बेकी होऊ देऊ नये, असा संदेश दिला. 80 ते 85 वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी अस्पृश्य वर्गातील विविध घटकांना एकीचा मार्ग सांगितला होता. ते आजची स्थिती पाहता किती सार्थ होते, हे प्रत्ययाला येते. 

सोलापुरात मानपत्र प्रदान सोहळा
22 मे 1932 रोजी सोलापूर अस्पृश्य जनतेने जेव्हा बाबासाहेबांना मानपत्र दिले होते तेव्हाही त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून सर्वाींगण उन्नती करुन घेतली पाहिजे. इतरांच्या सोवळ्या सहकार्याने अस्पृश्यता कदापि नष्ट होणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. 

भलत्याला मत देऊ नका
24 जानेवारी 1937 रोजी लेजिस्लेटिव्ह अ‍ॅसेम्ब्लीच्या निवडणुकीनिमित्ताने स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाबासाहेब सोलापूरला आले होते. तेव्हा त्यांनी लोकांना जीवाप्पा ऐदाळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मताचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, ‘तुमच्या मताची किंमत मीठ-मिरचीसारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच किंबहुना जास्त तुमच्या मतांची किंमत आहे हे विसरु नका. भलत्या उमेदवाराला मत द्याल तर खाटकाच्या हाती बकर्‍याने सुरी दिल्यासारखे होईल.’

आजच्या निवडणुकीचे स्वरुप, प्रचार, उमेदवारांना तिकीट वाटप, मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांचे स्वरुप आणि निवडूण आल्यानंतरचे प्रतिनिधींचे वर्तन पाहिल्यावर बाबासाहेबांच्या इशार्‍याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. 

महार-मांगातील रोटीबंदी, बेटीबंदी अजिबात नष्ट झाली पाहिजे. प्रत्येक जात जर आपली शेखी मिरविण्यातच पटाईत असते. आपल्या जातीसच चिटकून राहाल तर महार हा महारच राहील व मांग हा मांगच राहील. आपल्यावर होणार्‍या अन्यायाचा प्रतिकार करु शकणार नाही. प्रत्येक जातीचा अभिमान करावा, असा कोणता उज्ज्वल इतिहास तुमच्या डोळ्यापुढे उभा राहतो. का जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे? बाकीचा सर्व समाज तुम्हाला तुच्छ लेखीत आहे, असे ओजस्वी आणि क्रांतीकारी विचार करकंब येथील सभेत 31 डिसेंबर 1937 रोजी महार-मांग समाजाच्या सभेत मांडलेले होते. 
म्हणजे बाबासाहेबांना जातीविहिन एकसंघ समाज, देश निर्माण करायचा होता. बौध्द धम्मात जात-वर्ग, उच्च-निच्च असा भेदभाव नाही, हेच त्यांना व्यक्त करावयाचे होते. सोलापूर आणि बाबासाहेबांचे अतूट नाते होते. त्यांनी सोलापूरला अस्पृश्यांच्या मुलांचे पहिले वसतिगृह सुरु केले होते. गरिबीमुळे अस्पृश्यांची मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यावर एकमेव उपाय म्हणजे वसतिगृहाची अनिवार्यता होय.

बावी येथील चिरंतन आठवणी
वा. रा. कोठारी हे मोडनिंबचे होते. ते बाबासाहेबांचे स्नेही होते. बाबासाहेबांनी माता रमाईला हवापालटासाठी शेटफळ बावी याठिकाणी आणलेले होते. रमाई काही काळ बावीला राहिल्या होत्या. त्याचवेळी बाबासाहेबांचे वास्तव्य बावीला होते. दोघांच्या वास्तव्याच्या वेळी जिल्ह्यातील पुढारी व जनता बाबासाहेबांच्या भेटीला येत असत. त्यांना भेटून अडाणी जनतेला आपल्या उध्दारकर्त्याचे दर्शन घडले आहे, जीवनाचे सार्थक झाले, असे वाटायचे. 

ख्रिस्ती समाजबांधवांचे प्रबोधन
सोलापूर येथे 1 जानेवारी 1938 रोजी नववर्षाच्या सुरुवातीलाच ख्रिस्ती समाजापुढे बाबासाहेबांचे भाषण झाले. “जगात उपलब्ध असलेल्या धर्मांपैकी दोनच धर्म व त्यातील दोनच व्यक्ती धर्मांतराच्यादृष्टीने माझ्यासमोर आहेत. त्यापैकी एक बुध्द आणि दुसरा ख्रिस्त.’’ आम्हाला कसला धर्म हवा आहे असे सांगून ते म्हणाले की, ‘मनुष्याने मनुष्याशी कर्तव्य काय व मनुष्याचे देवाशी कर्तव्य काय आहे. मुलाने बापाशी कसे वागावे, सर्व माणसांत समता, स्वातंत्र्यता ज्या धर्मात अनुभवास सापडेल असाच धर्म मला व माझ्या अनुयायांना हवा आहे.’

ख्रिस्तीबांधवांना स्पष्टपणे सांगताना ते असेही म्हणाले होते की, ‘मद्रासकडे चर्चमधून जातीभेद पाळला जातो. तो जातीभेद ख्रिस्तीच्या धर्मातील नाही. तुमच्या धर्मात नसलेली घाण तुम्ही त्यागलेल्या धर्मातून आणून आपल्या उराशी बाळगत असाल तर ती एक लांच्छनास्पद गोष्ट आहे’.

तडवळे ढोकीतील ऐतिसिक भेट
22 व 23 फेब्रुवारी 1941 ला कसबे तडवळे (ढोकी) येथे झालेली ‘महार-मांग वतनदार परिषद’ ऐतिहासिक होती. खालसा आणि निजामशाही हद्दीतील 50-60 गावांतील अस्पृश्य जनतेच्यादृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची व ऐतिहासिक परिषद ठरली. या सभेला 30 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. बाबासाहेेबांचा मुक्काम तडवळ्याला होता. त्यांचे दर्शन झाल्याने भोळीभाबडी जनता तृप्त झाली होती. वाहतुकीची कोणतीही साधने नसताना अफाट जनसमुदाय जमला होता. बाबासाहेबांनी या सभेत समाजाला काँग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. 

हरिजन सेवक संघाच्या दांभीकतेवर बाबासाहेबांनी बोट ठेवलेले होते. निजाम सरकारने अस्पृश्यांसाठी काहीही केलेले नाही. खालसा म्हणजे इंग्रजी मुलकातही काहीही झालेले नाही. अस्पृश्यांची स्थिती शोचनीय आहे. त्यांना उपजीविकेसाठी पडिक जमिनी दिलेल्या आहेत. अस्पृश्यांच्या शिक्षणाचाही प्रश्‍न सुटलेला नाही.त्यासाठी आपणात संघटना असणे गरजेचे आहे. हैदराबादच्या नवीन होणार्‍या राज्यघटनेत अस्पृश्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधीत्त्व मिळाले पाहिजे, अशी राजकीय जागरणाची घोषणा त्यांनी केली होती.

सोलापूर जिल्हा महार वतनदार परिषदेचे दुसरे अधिवेशन 26 व 27 नोव्हेंबर 1927 रोजी थोरला महारवाडा (सध्याचे मिलिंदनगर, पंचाची चावडी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. छायाचित्रात परिषदेचे कार्यकारी सदस्य विश्‍वनाथ मेघाजी बनसोडे, मुकिंदा कुंडलिका बाबरे, निवृत्ती तुकाराम बनसोडे, रामा तुकाराम सरवदे, पापा सोमाजी तळभंडारे, विठ्ठल दरी सरवदे, तुकाराम अंदुबा बाबरे, बळी तुळजाराम तळमोहिते, भिकाजी गुरप्पा तळभंडारे, स्वागताध्यक्ष जिवाप्पा सुभानराव ऐदाळे, चिटणीस उद्धव धोंडो शिवशरण, खजिनदार हरिभाऊ तोरणे यांच्यासह शेठ माणिकचंद रामचंद शहा आदी दिसत आहेत. 

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेली भाषणे
26 व 27 नोव्हेंबर 1927 : सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे दुसरे अधिवेशन - “अस्पृशोन्नतीचा आर्थिक पाया’’

6 मार्च 1932 : सोलापूर रेल्वे स्टेशन येथे स्पृश्य व अस्पृश्य मंडळींसमोर केलेले भाषण - “महार, मांग, ढोर, चांभार, भंगी वगैरे मंडळींनी आपापसांत एकी केली पाहिजे.’’

22 मे 1932 : सोलापूर येथे मानपत्र प्रदानप्रसंगी दिलेले भाषण- “अस्पृश्यांनी स्वतःच्या पायावर सर्वांगिण उन्नती करावी.’’

24 जानेवारी 1937 ः मुंबई लेजिस्लेटिव्ह अ‍ॅसेम्ब्लीच्या निवडणुकीनिमित्त केलेले भाषण - “इंग्रज गेल्यावर खोत-जमीनदार कुठे जाणार?’’

31 डिसेंबर 1937 ः करकंब येथे मातंग समाजापुढे केलेले भाषण-“जातीभेद ही वरुन वाहत आलेली गटारगंगा आहे.’’

31 डिसेंबर 1937 ः पंढरपूर येथे अस्पृश्य राजकीय परिषदेत केेलेले भाषण - “या लढ्यात तुमच्याजवळ हरपण्यासारखे काय आहे?’’

1 जानेवारी 1938 ः सोलापुरात ख्रिस्ती समाजापुढे दिलेले भाषण-“ख्रिस्ती पुढारी राजकीय हक्कांविषयी उदासिन.’’

4 जानेवारी 1938 ः सोलापुरातील भागवत चित्र मंदिर येथे मानपत्राला उत्तर देताना केलेले भाषण - “संसदीय लोकशाहीचे कार्य.’’

23 फेब्रुवारी 1941 ः वतनदार महार-मांग परिषद तडवळे ढोकी येथे दिलेले भाषण - “काँग्रेसपासून सावध राहा.’’

14 जानेवारी 1946 ः सोलापूर न.प.तर्फे दिलेल्या मानपत्राला उत्तर देताना केलेले भाषण - “स्वातंत्र्याची बडबड करणार्‍यांनी काय केले?’’

14 जानेवारी 1946 ः सोलापुरात ‘शेकाफे’च्या सभेत केलेले भाषण-“इंग्रजानंतर या देशावर राज्य कोण करणार?’’

Tags : dr babasaheb ambedkar, solapur