Sat, Aug 24, 2019 10:26होमपेज › Solapur › मोहोळ : बनावट शिक्के, पावत्यांद्वारे 45 लाखांना चुना

मोहोळ : बनावट शिक्के, पावत्यांद्वारे 45 लाखांना चुना

Published On: Jul 01 2018 12:11AM | Last Updated: Jul 01 2018 12:05AMमोहोळ  : वार्ताहर

कर्जदारांशी संगनमत करून पतसंस्थेच्या नावाचे बनावट शिक्के व पावत्या तयार केल्या व त्याद्वारे पतसंस्थेच्या माजी कर्मचार्‍यांनीच मोहोळ येथील सद‍्गुरू पतसंस्थेला तब्बल 45 लाख 8 हजार 417 रुपयांचा चुना लावला. ही धक्‍कादायक बाब उघडकीस आल्यानंतर मोहोळ शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मोहोळ पोलिसांत पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, सद‍्गुरू सहकारी पतसंस्था सन 2004 पासून मोहोळ येथे कार्यरत आहे. अल्पावधीतच या पतसंस्थेने मोहोळ शहर व परिसरात नावलौकीक मिळवला. या पतसंस्थेचे खातेदार असणारे सुनील सुखदेव भोसले (रा. बुधवार पेठ, मोहोळ) यांनी 13 फेब्रुवारी 2013 रोजी पतसंस्थेकडून 14 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, तर बाळासाहेब अर्जुन गायकवाड यांनी 5 लाख 52 हजार रुपये तसेच संजय विकास पडवळकर यांनी 20 लाखांचे कर्ज घेतले होते. 

मात्र, पतसंस्थेचे माजी कर्मचारी संदीप सदाशिव बिडकर, विनोद जालिंदर परबळकर यांच्या म्हणण्यानुसार भोसले हे कर्ज फेडत नव्हते. त्यामुळे पतसंस्था प्रशासनाने सहकार कायद्याच्या नियम 101 अन्वये सहायक निबंधक यांच्याकडून कर्ज वसूल करण्याबाबतची परवानगी घेतली होती. त्यानंतर सुनील भोसले यांना वेळोवेळी कर्ज फेडण्याबाबत नोटिसा पाठवूनदेखील ते कर्ज भरत नव्हते. याउलट त्यांनी हे कर्ज भरले असल्याबाबतचे उत्तर पतसंस्थेला दिल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला. असाच प्रकार उर्वरित दोन्ही कर्जदारांच्या बाबतीत झाला.

पतसंस्थेच्या रेकॉर्डला कर्जाची परतफेड झाली नसल्याचे दाखवले जात होते. त्यामुळे या कर्जदारांच्या स्थावर आणि जंगम मिळकतीवर बोजा चढविण्याची मागणी मोहोळ मंडल अधिकारी यांच्याकडे पतसंस्था प्रशासनाने केली होती. त्यावेळी या कर्जदाराने कर्ज भरले असल्याबाबतच्या पावत्या मंडल अधिकारी यांच्याकडे सादर केल्या होत्या. त्यावर पतसंस्थेचे म्हणणे मागविण्यात आले असता, या पावत्या आणि बेबाकी दाखला पाहिल्यानंतर त्यावर बनावट शिक्‍का असल्याची खळबळजनक बाब समोर आली. वास्तविक पाहता, पतसंस्थेचा प्रत्येक व्यवहार आणि कामकाज हे संगणकाद्वारे केले जाते. त्यामुळे कर्जदार सुनील भोसले, बाळासाहेब गायकवाड व संजय पडवळकर यांनी पतसंस्थेचे माजी कर्मचारी संदीप सदाशिव बिडकर, विनोद जालिंदर परबळकर यांच्याशी  संगनमत करुन  पतसंस्थेची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली.

याप्रकरणी सद‍्गुरु पतसंस्थेचे व्यवस्थापक राहुल देशपांडे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार कर्जदार सुनील सुखदेव भोसले, पतसंस्थेचे माजी कर्मचारी संदीप सदाशिव बिडकर, विनोद जालिंदर परबळकर (तिघेही रा. बुधवार पेठ मोहोळ) तसेच बाळासाहेब गायकवाड व संजय पडवळकर या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे सहकार क्षेत्र चांगलेच हादरले आहे. मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे हे करीत आहेत.